बुलडाणा - जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांसंदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेतली नसल्याने अखेर खामगाव तालुक्यातील पाळा गावच्या ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला. शाळेला शिक्षक मिळेपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
खामगाव तालुक्यातील पाळा येथे १ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. या वर्गांमध्ये एकूण ९३ विद्यार्थी पटावर आहेत. शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्षकांची पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी शिक्षकांची तीन पदे रिक्त आहेत, तर कार्यरत शिक्षकांपैकी एकाकडे मुख्याध्यापकांचा आणि शालेय पोषण आहाराचा पदभार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्या संदर्भात गावकऱ्यांनी आणि व्यवस्थापन समितीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारोवार निवेदने देण्यात आली. मात्र, कुठलीच दखल घेतली जात नसल्याने आज गावकऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री आणि शिक्षण मत्र्यांनाच शिक्षक देण्याची मागणी चिमुकल्या विद्यार्थिनीने केली आहे. गेल्या सत्रामध्ये शिक्षकांचे एक पद रिक्त होते. मात्र, या सत्रामध्ये दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, जोपर्यंत शाळेला शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नसल्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे.