बुलडाणा - जिल्ह्याचे ठिकाण असलेला बुलडाणा मतदारसंघ थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जातो. शिवाय राजकारणाच्या दृष्टीने पहिले तर हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. मात्र, नेत्यांच्या अंतर्गत असलेल्या वादामुळे सलग ३ टर्म शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे हा मतदारसंघ होता. मात्र, काँग्रेसने वाढवलेला जनसंपर्क आणि शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदेंबद्दल मतदारसंघात असलेली नाराजी, शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये असलेले दोन गट यामुळे २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयराज शिंदे हे चौथ्या क्रमांकावर होते.
हेही वाचा - MAHA VIDHAN SABHA : पवारांचा 'तो' प्रसिद्ध खंजीर.. राज्यातील पहिले आघाडी सरकार व सर्वात तरुण मुख्यमंत्री
मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर शिंदे याना ३२ हजार ९४६ मते मिळाली तर राष्ट्रवादीमधून आमदारकीसाठी मनसेत गेलेले संजय गायकवाड हे दुसऱ्या नंबरवर राहिले आणि त्यांना ३५ हजार ३२४ मते मिळाली. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ याना ४६ हजार ९८५ मते मिळाली आणि ते निवडून आले. निवडणुकीनंतर संजय गायकवाड यांनी खासदार जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता.
सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांचे वैर असल्याने या मतदारसंघात २ गट आहेत. मतदारसंघात जाधवांनी एकटे पाडलेले विजयराज शिंदे आणि खासदार गटात जिल्हाप्रमुख जालींधर बुधवंत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाडसह सर्व पदाधिकारी एकीकडे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कोण? याची उत्सुकता मतदारसंघासह जिल्ह्याला लागली आहे. कारण, मागील वेळीजरी शिवसेनेच्या विजयराज शिंदे यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे मतदारसंघात वलय अजूनही कायम आहे.
हेही वाचा - 'ईडी'बाहेर हजारो कार्यकर्ते राहणार उपस्थित..राष्ट्रवादीकडून शक्तीप्रदर्शनाचे संकेत
शिंदे यांनी अजूनही मतदारसंघात फिरणे सुरूच ठेवले असून त्यांना उमेवारीची अजूनही आशा आहे. मात्र, शिवसेनेत असलेल्या गटबाजीने त्यांना फटका बसण्याची शक्यात वर्तवली जात आहे. विजयराज शिंदे यांची उमेदवारी जरी निश्चित मानली जात असली तरी खासदार जाधव गटात असलेले संजय गायकवाड आणि जालिंदर बुधवंत यांनाही खासदारांनी उमेदवारीची हमी दिली आहे. त्यातच भाजपनेही हा मतदारसंघ भाजपकडे सोडावा अशी मागणी करत मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसेनेत इच्छुकांचा विचार केला तर माजी आमदार विजयराज शिंदे , जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत , उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाडसह अनेकजण इच्छुक आहेत. मुंबईला शिवसेनेच्या मुलखाती झाल्या असून त्यात बुलडाणा मतदारसंघासाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत.
२०१४ च्या निवडणुकीवेळी सर्वच पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. त्यावेळी बुलडाणा मतदारसंघात भाजपकडून २०१४ च्या निवडणुकीत नशीब आजमावनारे आणि तिसऱ्या नंबरवर राहिलेले योगेंद्र गोडे हेहि सध्या इच्छुक आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष फक्त आमदारकीसाठी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत व्हाया भाजपमध्ये आलेले धृपदराव सावळे हेसुद्धा बुलडाणा किंवा चिखली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयार आहेत. भाजप नेते योगेंद्र गोडे यांचे पालकमंत्री डॉ संजय कुटे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे बुलडाणा मतदारसंघ हा भाजपने आपल्याकडे मागितताय. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. पण, शिवसेनेत असलेल्या उमेदवारांची यादी पाहता खासदार याना डोकेदुखी ठरू शकते. म्हणून की काय चिखली आणि बुलडाणा मतदारसंघ अदलाबदलीची शक्यताही नाकारता येत नाही. विजयराज शिंदे यांना तिकीट मिळाले तर शिवसेनेत बंडखोरी सुद्धा होऊ शकते. त्यातच महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ हे २०१४ च्या निवडणुकीत ४६९८५ मतांनी निवडून आले. मात्र, त्यावेळी त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, थेट राहुल गांधींच्या कोट्यातून त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडून आले.
या निवडणुकीतही त्यांची उमेदवारी ठरलेली आहे. यावेळी आघाडीमध्ये त्यांच्या उमेदवारीला विरोध होत असून मोताळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थकांनी लोकसभेत राष्ट्रवादीचे काम केले नाही. यांच्याविरोधात ठराव घेण्यात आला होता. तर, दुसरीकडे काँग्रेसमध्येही इच्छुकांची चांगलीच यादी पाहायला मिळते आहे. त्यात जयश्री शेळके, संजय राठोड, मीनल आंबेकरसह अनेक नेते यांचा समावेश आहे. तर, बुलडाणा नगरपालिका ही भारिपच्या ताब्यात असल्याने वंचितने या ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. त्यातही प्रा सदानंद माळी, विष्णू उबाळे, जितेंद्र जैनसह अनेक उच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेची असलेली गटबाजी, विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचण्याबद्दल असलेली नाराजी, वंचित बहुजन आघाडीचे बुलडाणा शहरात वाढलेले प्राबल्य पाहता आणि भाजपने केलेले दावे यामुळे मात्र मतदासंघातील मतदार ही संभ्रमात आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारात सरळ लढत होण्याची शक्यता आहे.
२०१४ मध्ये मिळालेली मतं-
1. हर्षवर्धन सपकाळ (काँग्रेस) ४६९८५
2. संजय गायकवाड (मनसे) ३५३२४
3. योगेंद्र गोडे (भाजप) ३३२३७
4. विजयराज शिंदे ३२९४६