बुलडाणा - मलकापूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू वाहतुकीच्या टिप्परने आज एका महिलेचा बळी घेतला आहे. मलकापूरच्या धुपेश्वर रोडवर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. नलिनी भटकर असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात संतोष भटकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील संतोष भटकर हे आणि त्यांची पत्नी नलिनी भटकर (वय ३५) हे मलकापूर येथील लग्न समारंभ आटोपून धुपेश्वरमार्गे घरी अकोला खुर्दकडे जात होते. मात्र, त्यांच्या मोटरसायकलला धुपेश्वरजवळ भरधाव वेगातील अवैध वाळूच्या टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टिप्परसुद्धा रस्त्यावर पलटी झाला होता.
मलकापूर तालुक्यातील अनेक नागरिकांनी होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी स्थानिक तहसीलदार यांच्याकडे केल्या, मात्र तहसील प्रशासन वाळू माफियांवर कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले असून याआधीसुद्धा या टिप्परमुळे अनेक लोकांचे जीव गेले असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.