बुलडाणा - कामगार मंडळांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्यास मदत होते. त्यामुळे, लवकरच राज्यात खासगी प्रवासी वाहन चालक कामगारांचे मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कामगारमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केली आहे. ते जळगाव जामोद येथे आयोजित कामगार मेळाव्यात बोलत होते.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणावर बांधकाम कामगारांना लाभ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना नगर पालिकेत येत्या ३ सप्टेंबरपासून सुरक्षा किटचे वाटप सुरू होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. कुटे यांनी सांगितले. योजनेच्या लाभासाठी कुठेही पैसे देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कुणी पैसे मागितले, तर त्याची पोलीस ठाण्यात रितसर तक्रार द्यावी, असे आवाहनही कुटे यांनी यावेळी केले.
नजिकच्या काळात नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी साहित्याची किट देण्यात येणार आहे. केवळ ५ रूपयांत आहार देणारी अटल आहार योजना जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. तसेच पाच हजार रूपयांचे साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. मागील ९ वर्षापासून रखडलेला दुकाने व आस्थापना विभागाशी संबंधीत कामगारांच्या किमान वेतन वाढीचा प्रश्न निकाली लागला असून त्यांचे किमान वेतन दुप्पट करण्यात आले आहे. अशा अनेक घोषणा कुटे यांनी मेळाव्यात केल्या.
कार्यक्रमादरम्यान अनिल जंगम, हफीजखान उस्मानखान, रहीमखान महेबूबखान, सुभाष काकडे, रामेश्वर मंडोकारे, गुलाम दस्तगीर, भानुदास सोळंके, आझाम बेग हाफीज बेग, दयाराम बेलकर, अतुल सुरेश यांना किट व धनादेशाचे वितरण करण्यात आले. तसेच वर्षाराणी संतोष शेगोकार यांना 2 लाख रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. यावेळी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश (मुन्ना) यादव, नगराध्यक्षा सौ सिमाताई कैलास डोबे, जि. प सभापती सौ. श्वेताताई महाले, संग्रामपूर नगराध्यक्ष अनिल राजनकर, शेगावच्या नगराध्यक्षा सौ. शकुंतला बूच, संग्रामपूर पं.स सभापती श्रीमती वाघ, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यु श्रीरंगम, अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे, सहाय्यक कामगार आयुक्त राजु दे. गुल्हाने, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपविभागीय अधिकारी सौ. वैशाली देवकर, तहसलिदार शिवाजी मगर आदी उपस्थित होते