बुलडाणा - शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहतूक करण्यासाठी कुठलीही मनाई नाही. त्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतातील भाजीपाला, फळे, धान्य इतर शेतमाल शहर किंवा जिल्ह्याबाहेर नेता येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुलडाणा येथे दिली. तसेच सोशल मीडियावर जर कोणी तबलिगीच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणारे मॅसेजेस पोस्ट करीत असेल अशांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री यांनी बुलडाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.
गृहमंत्री देशमुख बुलडाणा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी 19 एप्रिल रोजी आले असता रात्री बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. कोरोना संसर्गाबाबत हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यातील 14 जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानुषंगाने बुलडाणा पालकमंत्री, खासदार, आमदार यासह जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी रात्री चर्चा केली. त्यानंतर लगेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील शेतमाल वाहतूक करण्यासाठी कुठलीही मनाई नाही. त्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतातील भाजीपाला, फळे, धान्य इतर शेतमाल शहर, जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर नेता येईल, अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. तबलिगीचा मुद्दा घेऊन सोशल मीडियावर हिंदू-मुस्लिम करीत समाजावर तेढ निर्माण करण्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असून कारवाईबाबत प्रश्न विचारल्यावर अशांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला.