बुलडाणा - शेतकऱ्याने बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन शेतात पेरणी केली. सुरुवातील पीक चांगले बहरले होते. मात्र, १२ वर्षांपासून गायब झालेला पाऊस सतत १५ दिवस बरसला अन् क्षणार्धात सर्व होत्याचं नव्हतं झालं. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारपण, दोन मुलांचे शिक्षण हे सर्व प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिले. त्यातच बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज. या सर्व गोष्टींचा गणेश मेतकर बळी ठरले.
दुष्काळाने बळीराजाला अगदी हैराण करून सोडले आहे. कधी कधी अचानक गारपीट होते. तर पाऊस मुसळधार पाऊस येतो. त्यामध्ये संपूर्ण पीके उद्ध्वस्त होतात. त्यामुळे एकही रुपया हाती न लागता उलट कर्ज वाढते. हाच कर्जाचा बोजा असह्य झाल्यावर आपला शेतकरी बंधू आत्महत्येचा मार्ग अवलंबतो आणि आपले जीवन संपवून या दु:खातून कायमचा मुक्त होतो. अशीच एक मुक्ती जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या बोरी आडगाव या गावातील गणेश मेतकर नावाच्या ५० वर्षीय अल्प भूधारक शेतकऱ्याने केली.
हे वाचलं का? - ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात पहिला बळी, दीड लाखांचे होते कर्ज
मृत गणेश मेतकर यांची बोरी आडगाव येथे ४ एकर शेती आहे. त्यांना १८ वर्षांचा मुलगा आणि १५ वर्षांची मुलगी आहे. त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून त्यांनी शेतात सोयाबीन, कपाशी उडीद, मुग आणि तूर अशी पिके पेरली होती. सुरुवातीला बहरलेली पीके पाहून मेतकर समाधानी होती. त्यामुळे यामधून बँकेचे कर्ज फेडता येईल, असे त्यांना वाटले. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून गायब असलेला पाऊस अचानक बरसला आणि १५ दिवस ठाण मांडून बसला. त्यामुळे पिकांची नासाडी झाली. त्यात नुकसानीचे पंचनामेही झाले नाही. सर्व पाहून मेतकर व्यथित झाले. आता करायचे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. पत्नी आणि मुले लग्नाला बाहेरगावी गेले होते. तेवढ्यात घरी कोणी नसल्याचे पाहून त्यांनी गुरुवारी विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात २ मुले आणि पत्नी असा परिवार आहे.
हे वाचलं का? - केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावातील युवा शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
...ते वाचलेही असते -
ओल्या दुष्काळाने व्यथित होऊन गणेश मेतकर यांनी गुरुवारी आत्महत्या केली. शुक्रवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत तहसील प्रशासनाकडून कुठलेही कर्मचारी आणि अधिकारी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या भेटीसाठी पोहोचले नव्हते. विशेष म्हणजे घटना घडताच गावकऱ्यांनी तहसील प्रशासनाला हे आत्महत्येची माहिती दिली होती. नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत पुरवली असती तर कदाचित त्यांनी आत्महत्या केली नसती हे देखील तेवढेच खरे आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे कुटुंब रस्त्यावर -
घरातील कर्ता पुरूष गेल्यानंतर अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. कर्जाच्या परतफेडीचा प्रश्न आ वासून उभा आहे. मुलांना शिकण्याची इच्छा आहे. मात्र, खर्च परवडत नसल्याने त्यांना कुठे पाठवणार? राहायला घर नाही म्हणून दुसऱ्यांकडे आश्रय घ्यावा लागतोय. बुलडाणा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या या व्यथा आहेत. जिल्हा प्रशासनाने या कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि आता या कुटुंबाला मदत करण्यासाठी सुक्ष्म नियोजन केले जाणार आहे, असे तहसीलदार डॉ. शितलकुमार रसाळ यांनी सांगितले.
हे वाचलं का? - सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या....शेतकरी पुत्राची राज्यपालांकडे मागणी
बुलडाण्यात १० महिन्यात २२५ शेतकऱ्यांची आत्महत्या -
जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २२५ शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापिकीमुळे आत्महत्या केली आहे. त्यांच्या माघारी त्यांचे कुटुंब कसे जीवन जगतात? त्यांच्या व्यथा व त्यांचा जगण्याचा संघर्ष मन सुन्न करणारा आहे. अनेक कुटुंब पडक्या झोपडीत भविष्यातील चांगल्या दिवसांची आशा बाळगून कसबसे जीवन काढत आहेत. या कुटुंबांना त्यांच्या जीवन संघर्षात साथ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावा, अशी आशा आजही त्यांना आहे.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची समस्या -
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अर्थसाह्य मिळाले नाही.
- मुलांच्या शिक्षणासाठीची सोय नाही.
- कर्जाची परतफेड करण्याची परिस्थिती नाही.
- राहण्यासाठी घर नाही.
- आरोग्य सुविधा मिळत नाही.
- घरकुल, शौचालय योजनेच्या यादीत नाव असूनही लाभ मिळालेला नाही.
- शेती शिवाय उत्पन्नाचा स्त्रोत नाही.
- स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा असून मुलांसाठी कुठलीही सुविधा नाही.