बुलडाणा - वाढदिवस साजरा करताना सर्रासपणे नंग्या तलवारी नाचविल्याप्रकरणी मलकापूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष हाजी रशीद खान जमादार व अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अॅड. जावेद कुरेशी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, हे गुन्हे दाखल करणे आणि त्याअंतर्गत अटक करणे चुकीचे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 15) जिल्हा काँग्रेसमधील काही जण जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला गेले होते. या वेळी, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी 'निवेदन द्या, मी चौकशी करतो,' असे म्हटले. मात्र, पोलीस अधीक्षकांनी काहीच न ऐकता 'निवेदन द्या, मी चौकशी करतो,' म्हटल्याचे सांगत हे सर्वजण मागण्यांचे निवेदन न देताच परत गेले.
काँग्रेसतर्फे हाजी रशीद खान जमादार आणि आयोजक अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अॅड. जावेद कुरेशी यांच्यावर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचे सांगत व काँग्रेसचे वयोवृद्ध रशीद खान जमादार यांना अटक केल्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी अतिघाईत असे गुन्हे दाखल केल्याचे सांगत त्यांच्यावरच हे गुन्हे दाखल केल्याबद्दल कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी पोलीस अधीक्षकांकडे सोमवारी गेले होते. या वेळी, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, मलकापूर आमदार राजेश एकडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, दत्ता काकास, विनोद बेंडवाल, जाकिर कुरेशी, रिजवान सौदागर, अमीन टेलर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया यांना भेटून बाजू मांडली. मात्र, यादरम्यानच हे सर्व जण मागण्यांचे निवेदन न देताच पोलीस अधीक्षकांच्या केबिनमधून बाहेर आले. पोलीस अधीक्षकांनी काहीच न ऐकता 'निवेदन द्या, मी चौकशी करतो,' असे म्हटल्याचे सांगत हे सर्वजण मागण्यांचे निवेदन न देताच परत गेले.
'मागण्यांचे निवेदन दिल्यावर त्यानुसार चौकशी केली जाईल' - जिल्हा पोलीस अधीक्षक
'मलकापूर येथे वाढदिवस साजरा करताना सर्रासपणे नंग्या तलवारी नाचवत कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी मलकापूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष हाजी रशीद खान जमादार यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, ही अटक चुकीच्या पध्दतीने केल्याचे जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार व माजी आमदारांसह व कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. सध्या दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. तसेच, ते काही नवीन माहिती देत होते. आपण मुद्देनिहाय माहिती लेखी स्वरूपात दिली तर, प्रत्येक मुद्द्यावर आम्ही चौकशी करू, जेणेकरून काही चुकीचे होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, आपण त्यांना सांगितले,' अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.