बुलडाणा - कोरोनाचे संकट अजूनही गंभीर असताना केंद्रातील मोदी सरकार जेईई व नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे. लाखो विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना देखील मोदी सरकार परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. केंद्र सरकारच्या या हट्टवादी भुमिकेला विरोध करत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आज (३१ ऑगस्ट) खामगावात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
खासदार राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्याची चिंता व्यक्त करत परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली आहे. एनएसयूआयनेही केंद्र सरकारच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रदेश काँग्रेसही केंद्र सरकारच्या या मनमानी भुमिकेच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर आज केंद्राचा विरोध करण्यासाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली खामगावातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान हाताला काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध करण्यात आला. नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी, भाजप सरकार हाय-हाय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा-नारायण राणे आणि राम कदमांच्या 'त्या' वक्तव्यांना कृषिमंत्र्यांनी दिले उत्तर, म्हणाले..