बुलडाणा - लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्याठिकाणी आम्हाला यश मिळाले. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. ते जेवढ्या सभा घेतील तेवढ्या जास्त जागा आमच्या येतील, असे उपहासात्मक वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील भाजप-शिवसेना युतीमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस हे आज रविवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी नांदुरा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. कोठारी हायस्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आपल्या भाषणातून हल्लाबोल केला. ते म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीने पंधरा वर्ष सत्ता भोगली. त्यांनी आपली हार मानलेली आहे. त्यामुळे सगळी आश्वासने पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये देऊन टाकलेली आहेत. फक्त दोनच आश्वासने द्यायची राहिली एक म्हणजे प्रत्येक कुटुंबाला एक ताजमहल आणि दुसरे म्हणजे चंद्रावर प्रत्येकाला एक प्लॉट, अशी मिश्किल टीका त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - 'कितीतरी पंतप्रधान येऊन गेले पण 370 कलम हटविण्याची ताकद मोदींमध्येच'
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे भाजप उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ आज 13 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर गृहराज्यमंत्री राणजीत पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणले, की देशातील सर्वात मोठी कर्जमाफी महाराष्ट्रात केली. आतापर्यंत पन्नास लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला असून अजूनही कर्जमाफी बंद केलेली नाही. जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तो पर्यंत आमचे सरकार स्वस्थ बसणार नाही, असे म्हणत यावेळी देखील महाराष्ट्रात युतीचे सरकार येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा - शिरुर शहरातून भाजप अध्यक्ष अमित शाहंची रॅली
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, यांच्या पक्षाची अवस्था बिकट झाली असून 25 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत येणार नाही. पाच वर्षात सर्व प्रश्न सुटले असा दावा मी करत नाही. पण 5 वर्षात जे आम्ही केले ते या पूर्वीच्या सरकारने 15 वर्षात केले नाही. आमच्या सरकारने पाच वर्षात राज्यात गरीबांना सात लाख घरे बांधुन दिली. दहा लाख घरे बांधणे सुरू आहे. 2022 पर्यंत सर्वांना घर मिळणार असे नियोजन केले जात आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.