बुलडाणा - जिल्ह्यात चिखली-खामगाव मार्गावर वैरागड गावाजवळ 3 वाहनामध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहाडी घाटात तीन वाहनांचा अपघात झाला. जखमी आणि मृतांना घटनास्थळावरून खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे
अपघातात गाडीचा झाला चुराडा -
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव जालना या राष्ट्रीय महामार्गावरील वैरागड फाट्याजवळ आज (मंगळवार) पहाटे हा अपघात झाला असून अपघात इतका भीषण होता की या अपघातात टाटा सुमोचा चुराडा झाला आहे. दोन मालवाहू बोलेरो सोयाबीनचे पोते घेऊन खामगावकडे जात असताना खामगावकडून चिखलीकडे जाणाऱ्या महावितरण कंपनीच्या सुमो गाडीला धडकून हा विचित्र अपघात झाला.
जखमींना तत्काळ केले रुग्णालयात दाखल -
वैरागड फाट्याजवळ झालेल्या या विचित्र अपघातात चार जण जागीच ठार झाले असून प्रवासी वाहनांमधील पाच जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतक आणि जखमींना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी गंभीर जखमी असलेल्या रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
हेही वाचा - VIDEO : स्टंटबाजांचा मीरा रोडवर धुमाकूळ, कारवाईची स्थानिकांची मागणी