बुलडाणा - भाजपने फक्त 'सबका साथ सबका विकास' या गप्पा मारल्या असून, या सरकारला शेतकरी आत्महत्यांचा वेगाने वाढणारे प्रमाण थांबवण्यात अपयश आल्याची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. तसेच याचा जाब विचारायला गेल्यावर सरकार 370 कलम काढल्याचे सांगते, असा टोला त्यांनी लगावला.
एमआयएमचे उमेदवार मो.सज्जाद यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर एआरडी मॉल समोरील मैदानात ओवैसी यांनी सभा घेतली. यावेळी, त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सतत पडत असलेल्या जीडीपीवर व फसलेल्या नोटबंदीवर सरकार बोलायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आज कित्येक कंपन्या बंद पडत आहेत. मात्र, केवळ बोल-घेवड्या गोष्टी करणारी भाजप ही ड्रामा कंपनी असल्याची खोचक टीका त्यांनी केली.
सभेदरम्यान, काँग्रेसने 70 वर्षे मुस्लिमांचा मतांसाठी वापर केल्याचा आरोप ओवैसी यांनी केला. तसेच काँग्रेस कमजोर झाली असून, त्या पक्षाची लढण्याची उमेद संपल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसल्याने, कुठे गेला विकास असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.