बुलडाणा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या विविध कार्यक्रमासाठी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते. कार्यक्रमात गर्दी झाल्याने संचारबंदी व कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. आकाश फुंडकरांनी केली आहे. गुन्हे दाखल न झाल्यास जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कारवाई न झाल्यास आंदोलन करणार - अॅड. आकाश फुंडकर
मागील आठवड्यात भाजपने ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी कोविड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ही कारवाई सूडबुद्धीने आणि द्वेषातून केली असल्याचा आरोप आमदार आकाश फुंडकर यांनी केला आहे. तर, गुरुवारी नाना पटोले यांच्या बुलडाणा दौऱ्यात विविध कार्यक्रमासाठी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित आल्याने गर्दी झाली. त्यामुळे सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी फुंडकर यांनी केली. याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
खामगाव आणि शेगावात काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुलडाणा दौऱ्यावर असताना मेहकर, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि शेगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमांत शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गर्दी झाली होती. त्यामुळे संचारबंदी व कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेगाव आणि खामगावमध्ये 29 काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा - संभाजीराजे, आंदोलनात चालढकल चालत नाही - चंद्रकांत पाटील