बुलडाणा - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपहरणाचे प्रयत्न करण्यात आले. शेगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा तर बुलडाण्यात एका बालकाचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, हे दोन्ही प्रयत्न फसले असून आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञांताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
हेही वाचा... 'त्या' आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेणार - प्रवीण दरेकर
शेगाव येथील सातवीत शिकणारी एक मुलगी आपल्या भावासह घरी जात होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला पैशाचे आमिष दाखवून गाडीत बसण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र, मुलीने हाताला झटका देत तेथून पळ काढला. स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्या अपहरणकर्त्यांनेही तेथून पळ काढला. तर दुसऱ्या घटनेत बुलडाणा येथील तोमई इंग्लिश स्कुलमध्ये शिकणाऱ्या मुलाला दोन भामट्यांनी शाळेतून पळवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या बालकाने त्या व्यक्तींना ओळखत नाही, असे सांगितल्याने शाळा प्रशासनाला सदर बाब लक्षात आली. त्यानंतर त्या आरोपींना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता, त्यांनी तेथून पळ काढला.
हेही वाचा... कोल्हापुरातील गडहिंग्लज, आजरा भागात पावसाची हजेरी
या दोन्ही प्रकरणी संबंधीत पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मलकापूर तालुक्यातील धरणगाव कुंड येथील एक 19 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. त्या प्रकरणी देखील बेपत्ता असण्याची तक्रार दाखल केली आहे. एकंदरीत अपहरण आणि बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.