बुलडाणा - जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाणे हद्दीतील माटरगावजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने कर्तव्यावर असणाऱ्या उमेश सिरसाट (वय ३२) या पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे समोर आली. त्यांच्यावर त्यांच्या भादोला गावातील शेतात पोलिसांनी मानवंदना देत तीन राऊंड आकाशात झाडून शासकीय इतमामात मानवंदना दिली. त्यांचे लहान भाऊ राजू सिरसाट यांनी त्यांना मुखाग्नी दिली.
शेगाव तालुक्यातील पूर्णा काठाजवळील भास्तन गावाजवळून अवैध रेती वाहतूक करणारे विना नंबर प्लेटचे टिप्पर जात होते. दरम्यान, शिरसाट हे कर्तव्यावर असतांना बुधवारी पहाटे ४ च्या दरम्यान सदर टिप्पर माटरगांव जवळून पुढे गेल्याने जलंब पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सिरसाट यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन दुचाकीने त्या टिप्परचा पाठलाग केला व आपली दुचाकी आडवी करून सदर टिप्पर थांबविले. मात्र, टिप्पर चालकाने पोलीस कर्मचारी शिरसाट यांच्या अंगावर टिप्पर घालून पोबारा केला. यामध्ये शिरसाट यांचा मृत्यू झाला. सदर वाहनाचा शोध घेवून टिप्पर (क्रमांक एमएच २८ बीबी -४९२३) व टिप्परच्या मालक, चालकाला जळगाव जामोद पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्यासह ५ आरोपींवर जलंब पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हत्या करणे यासह विविध कालमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मृत पोलीस कर्मचारी उमेश सिरसाट यांच्या पार्थिवाला त्यांच्या भादोला या गावी आणण्यात आले. त्यानंतर एका शेतात त्यांच्या पार्थिवाला पोलिसांनी मानवंदना देत तीन राउंड आकाशात झाडून शासकीय सलामी देत त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्यासह इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि गावकऱ्यांनी मृत पोलीस कर्मचारी उमेश सिरसाट यांना श्रद्धांजली दिली.