बुलडाणा - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने भाच्याने त्याच्या मित्रासह 65 वर्षीय आत्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली. ही घटना मोताळा तालुक्यातील ग्राम तालखेड येथे सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारा घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन दोन्ही आरोपींना अटक केली.
राहुल चोपडे आणि पवन चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर नलुबाई चोपडे असे मृताचे नाव आहे. प्रभाकर निनू चोपडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आत्या नलुबाई आणि पुतण्या राहुल हे एकाच घरात राहत होते. राहुल याला दारुचे व्यसन होते. नलुबाई या उजव्या पायाने अपंग असल्याने त्यांना निराधार योजनेचे पैसे मिळत होते. आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी तो नलुबाई यांच्याकडे पैशाची मागणी करत असे, यातून त्यांच्यामध्ये वाद होत असे.
सोमवार दिनांक 10 जून रोजी सर्वजण झोपलेले असताना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास राहुल आणि त्याचा मित्र पवन या दोघांनी मिळून नलुबाईने दारु पिण्यास पैसे न दिल्याचा रागातून कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली, अशी तक्रार प्रभाकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. यावरुन पोलिसांनी आरोपी राहुल चोपडे आणि त्याचा मित्र पवन चौधरी याला अटक केली.
आज मंगळवारी दोन्ही आरोपींना मोताळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन, पोलीस कॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.