बुलडाणा - नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील 11 तबलिगींपैकी तिघे कोरोनाबाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील दोघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये एका नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे. या दोघांचेही नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
याच तबलिगींच्या संपर्कात आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील होम डीवायएसपींसह 40 पोलीस कर्मचाऱ्यांनाही रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यांचे देखील वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
नागपूरच्या कामठी येथील अडकून पडलेल्या 11 तबलिगी जमातच्या सदस्यांपैकी 3 सदस्यांचे कोरोना रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये नगरसेविकेच्या पतीचा आणि आणखी एकाला रुग्णालयात क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे.
11 तबलिगींना नागपूरच्या कामठी येथे जाण्यासाठी परवानगी पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात विनंती अर्ज सादर केला होता. त्यावेळी होम डीवायएसपींसह 39 ते 40 पोलीस अधिकारी-कर्मचारी त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना ही रुग्णालयात क्वॉरेंटाईन करण्यात येणार आहे.