भंडारा - केवळ दहा रुपयांच्या माव्यासाठी (खर्रा) एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पंधरा दिवसाच्या संघर्षानंतर 6 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. मावा नाही दिला म्हणून युवकाला दगडाने जखमी केले असल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पवनारा येथे 15 दिवसांपूर्वी घडली होती. पुरुषोत्तम रामसिंग पटले (वय 28 वर्षे, रा. पवनारा टोली) असे मृतकाचे नाव आहे.
जेवणानंतर रस्त्याच्या कडेला शेकोटीजवळ असताना घडली घटना
19 डिसेंबर, 2020 च्या रात्री 10 वाजता मृत पुरुषोत्तम पटले हा थंडी असल्याने शेकोटीजवळ एकटाच बसला होता. त्यावेळी आरोपी चित्ता धुर्वे हा शेकोटी जवळ येऊन मृत पुरुषोत्तम यास तंबाकूचा खर्रा मागितला. मात्र, पुरुषोत्तमने खर्रा देण्यास नकार दिला म्हणून बाजूला असलेला दगड उचलत पुरुषोत्तमच्या डोक्यात घातला. जखमी अवस्थेत तो कसाबसा घरी पोहोचला व बेशुद्ध पडला. घरच्या लोकांनी त्याला प्रथम तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 15 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर पुरुषोत्तमची प्राणज्योत 6 जानेवारीला मावळली.
सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल होता गुन्हा
पुरुषोत्तमवर नेमका कोणी हल्ला केला याविषयी कुटुंबातील लोकांना माहित नव्हते. त्यामुळे सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मृत शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी आरोपी चित्ता धुर्वे यास अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, 6 जानेवारीला पुरुषोत्तमचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीवर हत्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कुटुंबाने केली फाशीची मागणी
पुरुषोत्तम हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. केवळ खर्रा दिला नाही म्हणून आरोपीने दगडाने त्याच्यावर हल्ला केला होता. पंधरा दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर संतापलेल्या आई-वडिलांनी आरोपीलाही मृत्यूदंडाची शिक्षा द्या, अशी मागणी केली.
हेही वाचा - बँक कर्मचारी निघाला 'एटीएम क्लोनिंग' प्रकरणाचा म्होरक्या
हेही वाचा - शुल्क न भरणाऱ्या मुलांना खासगी शाळांनी परिक्षेपासून ठेवले वंचित