भंडारा - पवनी वनपरिक्षेत्रात वाघिणीने मोहफुले गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव जनाबाई वामन मोहदळकर (वय 58) असून ती खातखेडा येथील रहिवाशी आहे. दरम्यान, मागील १२ दिवसातील वाघिणीचा हा दुसरा हल्ला आहे. याआधी वाघिणीने एका महिलेला ठार केले आहे.
आज (शनिवार) सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सहवनक्षेत्र सावरला येथील घनदाट जंगलात जनाबाई या मोहफुले वेचण्याकरिता गेल्या होत्या. तेव्हा झुडपात दबा धरून बसलेल्या वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जनाबाईचा मृत्यू झाला. जनाबाई या उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांचा मुलाने एका मित्रासोबत जंगलात जाऊन पाहिले असता जनाबाई मृतावस्थेत आढळून आल्या.
दरम्यान, माणसाची चाहूल लागताच वाघिणीने पळ काढला. ही घटना मुख्य रस्त्यापासून १ किलोमीटर अंतरावरील घनदाट जंगलात घडली आहे. जंगलात वाघांचा वावर असून नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागामार्फत वारंवार करण्यात येत आहे. मात्र, जंगलव्याप्त गावातील नागरिक याकडे दुर्लक्ष करून मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलाच्या आत जातात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सावरला सहवनक्षेत्रात १९ मार्चला एका महिलेला वाघिणीने ठार केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा वाघिणीने एका महिलेचा जीव घेतला आहे. यामुळे गावकऱ्यामध्ये दहशतीचे वातावरण असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांमधून होत आहे. भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होसिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल जाधव, पोलीस निरीक्षक यशवंत सोलासे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर वनविभागाने जनाबाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरिता पंचवीस हजाराची तातडीची मदत दिली आहे.
हेही वाचा - सलग 13 दिवस कोरोनाबाधितांची सेवा, रहिवाशांच्या स्वागतामुळे परिचारिकेला 'भावना' अनावर
हेही वाचा - भंडाऱ्यात आयसोलेशन वार्डात पुन्हा दोन संशयित रुग्णांचा मृत्यू, अहवालानंतर समजणार मृत्यूचे कारण