भंडारा - मोहाडी तालुक्यातील सूर नदी पूर्णपणे आटल्याने मोहाडी शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तीन ते चार दिवसानंतर पाणी मिळत असल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. प्रकल्पातील पाणी मिळाल्यास या पाण्याच्या समस्येवर मात करता येईल, असे नगराध्यक्ष यांनी सांगितले.
मोहाडी शहरातील नागरिक सकाळपासूनच हातात गुंड, बादल्या हातात घेऊन पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. मिळेल त्या बोरवेलवर, विहिरीवर पाण्यासाठी नागरिकांची झुंबड दिसते तर, काही बैलबंडीवर ड्रमद्वारे पाणी विकत आणतात. कारण मोहाडी शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ज्या सूर नदीवर बसवल्या गेली आहे. ही सूर नदी जानेवारी महिन्यापासून कोरडी पडायला सुरुवात झाली आहे. सध्या ही नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असल्याने शहराला तर दोन तीन दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. तोही पुरेसा नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
खरेतर या नदीमधील पाणी पातळी दरवर्षी कमी होते. मात्र, यावर्षी जानेवारीपासूनच पाणी पातळी कमी झाली आणि त्यातच दरवर्षी मिळणारा पेंच प्रकल्पाचे पाणी अजूनही मिळाले नसल्याने पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने काम करीत नाही. याबाबत मोहाडी नगराध्यक्षांना विचारले असता आम्ही पेंच प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी बरेचदा करूनही पाणी न सोडल्याने अडचण येत आहे. पुढच्या आठ दिवसात पेंच प्रकल्पातून पाणी सोडल्यास या समस्येवर मात करता येईल तसेच नगरपालिकेमार्फत दहा बोरवेल खोदण्यात आले आहेत.
भंडारा शहराला लागूनच वैनगंगा नदी आहे. या नदीमध्ये गोसे धरणाचे बॅक वॉटर असल्याने नदी दुथडी वाहत आहे. मात्र, जुन्या पाईपलाईनमुळे शहरात सर्वदूर पाणी पोहोचत नसल्याने टँकर मुक्त जिल्हा असे कागदोपत्री असले तरी शहराला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
सिंचन विभागांतर्गत येणाऱ्या चार मध्यम प्रकल्पांपैकी बेटेकर, बोथली आणि सोरणा प्रकल्प कोरडा पडला आहे. तर, तुमसर तालुक्यातील बघेडा प्रकल्पात केवळ १२.७२ टक्के आणि चांदपूर प्रकल्पात ते २३.३२ टक्के जलसाठा आहे. वाढत्या तापमानाने पाणी झपाट्याने खाली जात आहे. सध्या चार मध्यम प्रकल्पात ७.३२३ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. भंडारा जिल्ह्यातील ३२ लघु प्रकल्पात सध्या केवळ २०.२८ टक्के जलसाठा आहे. त्यापैकी पवनारखारी, डोंगरगाव, हिवरा आणि आमगाव हे प्रकल्प कोरडे पडले आहेत. तर, कारली, डोडमाझारी, मालीपार, चिखला पहिला, शिवनीबांध, भूमाध मेंढा या सहा प्रकल्पात केवळ पाच टक्के पाणी आहे. सद्यस्थितीत केसलवाडा लघु प्रकल्पात ५०.३१ टक्के जलसाठा आहे. तर, तुमसर तालुक्यातील कुरमूडा, अंबागड, परतवाडा, मोहाडी तालुक्यातील नागठाण, हिवरा, टांगा तालुक्यातील मांडणगाव, रावणवाडी, सिल्ली अंबाडी, पवनी तालुक्यातील वाही, खिडकी, गुढरी, लाखांदूर तालुक्यातील सालबर्डी, भुगाव, मेंढा आणि लाखनी तालुक्यातील रेंगेपर कोठा, निहारवानी, खुर्शीपार, पुरकाबोडी, हे जल प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यातील मध्यम लघु आणि मामा तलावात सध्या २३.४९ दलघमी जलसाठा असून हा एकूण जलसाठ्याच्या १९ टक्के आहे. याकरिता प्रशासन याच्यावर उपाय योजना करत असून तुमसर मोहाडी तालुक्यातला बावनथडी आणि पेंच नदीपासून पाणीपुरवठा केला जाणार आहे. यावर्षी या दोन्ही तालुक्याला या नद्यांच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागेल.
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात यावर्षी बरीच मालगुजारी तलाव कोरडे आहेत, केसलवाडा, कनेरी, डोंगरगाव, अंभोरा, येथील मामा तलाव कोरडे पडले आहेत. साकोली तालुक्यातील एकोडी, चांदोरी, आमगाव, वलमाझेरी, पिंडकेपार, पाथरी, सावरबांध, परसोडी, उमरी, सितेपार , लाखनी तालुक्यातील चांन्ना, कोका, तुमसर तालुक्यातील लोभी, लाखांदूर, तालुक्यातील, पिंपळगाव, इंदुरा, दिघोरी, दहेगाव आणि झरी तलावात केवळ १० ते ३० टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील भंडारा जिल्ह्यातील ६३९ गावांना पाणीटंचाईचे चटके बसत आहे. गावा नजीकचे तलाव कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. योजना पाहिजे त्या प्रमाणात कार्यान्वित नाही.
या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी पाणी टंचाई कृती आराखडा हाती घेतला असून या माध्यमातून नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, टँकर बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहीर खोल करणे गाळ काढणे या उपाययोजनांसाठी शासनाकडून चार कोटी 28 लाखाचे अनुदान प्राप्त झाले आहे.
सध्या शासनाच्या योजना कागदावरच आहेत. परिणामी महिलांसह अबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मे महिन्यात ही स्थिती आहे. त्यामुळे पाऊस उशिरा आल्यास जूनमध्ये पाणी प्रश्न अजून गंभीर होण्याची शक्यता आहे.