भंडारा - जिल्ह्यात सध्या वाळूघाट बंद आहेत. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात ट्रकवर उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या चमुसह कार्यवाही करून तहसील कार्यालय तुमसर येथे जमा केले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील वाळूला सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे वाळूघाट बंद असूनही नागपूर जिल्ह्यात असलेली मागणी पूर्ण करण्यासाठी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तुमसर तालुक्यातील बाम्हणी रेती घाटावरून रेतीचे उत्खनन करून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती तुमसर उपविभागीय अधिकारी नितीन सदगिरी यांना मिळताच ते आपल्या चमुसह थेट बाम्हणी डम्पिंग स्थळी पोहचले. या ठिकाणी सात ट्रकमध्ये वाळू भरल्या जात होती. या सात ट्रकमध्ये (एमएच ४० वाय ५३३३, एमएच 40 एके ४५६७, एमएच 35 एजे १८१०, एमएच 35 एजे १८९१, एमएच ४० एके ५१७५, एमएच ३५ एजे १५१०, एमएच ३५ एजे ९९१०) या ट्रकचा समावेश आहे. जप्त केलेले सर्व ट्रक हे गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील आहेत.
या सर्व ट्रकला जप्त करून तुमसर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या सर्व ट्रकवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा आणि पवनी हे तालुके वाळू माफियांचे चोरीचे मुख्य ठिकाण आहेत. या तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते आणि तेथील वाळू अतिशय उच्च दर्जाची आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यतील वाळू माफिया सह नागपूर जिल्ह्यातील वाळूमाफिया ही मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. एवढंच नाही तर लॉकडाऊनमध्येही हे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळू चोरी करत होते. जिल्ह्यातून वाळू चोरी करण्याच्या प्रयत्नात मोहाडी तालुक्यातील एक व्यक्ती ट्रॅक्टरखाली दबून मरण पावला होता. तर, पवनी तालुक्यात वाळू माफियांनी चक्क तहसीलदार यांच्या गाडीवर ट्रक चालविले होते. लॉकडाऊनमध्ये सीमा बंदी असूनही या वाळू माफियांनी जिल्ह्यात प्रवेश कसा मिळविला आणि वाळूची अवैध वाहतूक कोण्याच्या आशीर्वादाने करीत होते हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मात्र, आज 7 ट्रकवर ज्याप्रकारे कारवाई केली गेली. तशीच कारवाई सतत होत राहिली तर शासनाचे कोट्यवधींचे होणारे नुकसान थांबविता येईल.