भंडारा - उन्हाळ्याच्या सुट्ट्यात बाहेर गावी जात असाल तर सावधान..! कारण सध्या आपल्या शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कुलूपबंद असलेल्या घरातील चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणून नागरिकांनी गावी जाताना त्यासबंधीची माहिती पोलिसांना द्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. पोलीस विभागाद्वारे संपूर्ण जिल्ह्यात याविषयाचे पत्रक वाटले जात आहेत, तसेच गस्तही वाढविल्या जात आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये नागरिक लग्नकार्यासाठी किंवा फिरायला बाहेर गावी जातात. मात्र, घरात कुणी नसल्याचा फायदा घेत भुरटे चोर कुलूप असलेल्या घरात चोऱ्या करतात. सध्या संपूर्ण भंडारा शहरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भंडारा शहरातील लक्ष्मीनगर येथील अशोक मस्के यांच्या घरी बुधवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास चोरट्याने डल्ला मारला. अशोक मस्के हे लाखनी येथे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी घराच्या मागच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातून सोन्याचे दोन मंगळसूत्र, दोन अंगठ्या व गोफ आणि रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
काम संपवून मस्के घरी परत आले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून पुढील तपास सुरू केला. मात्र, चोरांचा अजूनही कोणताही सुगावा लागला नाही. या महिन्याभरात जवळपास 20 ते 25 चोऱ्या संपूर्ण जिल्ह्यात झाल्या आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
या चोरी प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेत भंडारा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जन-जागृतीचे पत्रके वाटली आणि सार्वजनिक ठिकाणी चिटकविण्यात आली. घराबाहेर जात असाल तेव्हा घरी कोणतेही दागिने ठेवू नये, रोख रक्कम ठेवू नये तसेच बाहेर जात असल्याची माहिती पोलिसांना द्यावी. जेणेकरून पोलीस दिवसा आणि रात्री तिथे गस्तीवर जातील, असे या पत्रकातून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरात दिवस आणि रात्र पाळीला पोलिसांच्या गस्तीतही वाढ करण्यात आली असल्याची माहिती अधीक्षकांनी दिली.