भंडारा - कर्तव्यावर हजर राहण्यास उशीर केला म्हणून आगार व्यवस्थापकाने गैरहजरी लावल्याने नाराज एसटी चालकाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संजय वैद्य (वय 52) असे या एसटी चालकाचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.
तुमसर येथील परिवहन महामंडळाच्या संजय वैद्य या चालकाने आगार व्यवस्थापकाच्या कक्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संजय रोजप्रमाणे आजही ड्युटीवर हजर झाला, मात्र वेळेवर हजर न झाल्याने अधिकाऱ्यांनी त्याला कोणतीही ड्युटी दिली नाही. त्यामुळे चालक आणि अधिकाऱ्यांमध्ये काही काळ भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या चालक संजय याने बाहेर जाऊन विष विकत घेतले. त्यानंतर व्यवस्थापकाच्या कक्षात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - भंडाऱ्यात प्लास्टिकबंदीबाबत प्रशासन उदासीन
विष घेतल्याचे लक्षात येताच तेथील लोकांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेनंतर तुमसर परिवहन महामंडळातील चालक-वाहक यांनी काही काळ बस थांबून ठेवल्या होत्या. तसेच आगार व्यवस्थापकावर आणि ड्युटी ऑफिसरवर कार्यवाही करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - मोहाडी तहसीलदारांनी रेती तस्करांना ठोठावला ७८ लाखांचा दंड