भंडारा - जिल्ह्यातील मुजबी येथे असलेल्या कोठारी मेटल परिसरातील खुल्या जागेवर बंद पडलेली विहिरीचे खोदकाम करत सुरू होते. यावेळी विहिरीतील मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने यात तीन मजूर अडकले होते. यात दोन मजूरांना बाहेर काढण्यात यश आले असून एक मजूर अजूनही अडकून पडला आहे. माती खाली दबुन असलेल्या मजूराचे नाव लेखराज बारसागड़े (वय 32 वर्ष) असे आहे. विलास येले व नरेश पाठक असे इतर दोन जणांचे नाव आहे.
अचानक माती खचली -
शहरालगत असलेल्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कोठारी मेटल्स येथे जुनी बुजलेली विहीर खोदकाम करण्यासाठी तीन मजुरांनी काम सुरू केले. दोन मजूर विहिरीच्या आत होते. तर एक मजूर हा मातीवर काढण्यासाठी वरच्या भागाला होता. काम सुरू असताना अचानक विहिर खचली आणि मातीचा मोठा ढिगारा खाली काम करणाऱ्या मजूरांच्या अंगावर पडला. यावेळी वर उभा असलेल्या मजुराने प्रसंगावधान साधून दोनपैकी एका मजुराला वर काढले. मात्र, तोपर्यंत त्या मातीच्या ढिगार्यात दुसरा मजूर पुर्णपणे दबला होता.
हेही वाचा - काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार - मंत्री वडेट्टीवार
तीन जेसीबीच्या मदतीने प्रयत्न सुरू -
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी, जेसीबी आणि अग्निशामक गाडी घेऊन घटनास्थळी पोहोचले. तीन जेसीबीच्या सहाय्याने लांब खड्डा खोदून या मजुराला जिवंत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, हे मजूर खाली काम करण्यासाठी उतरले असता त्यांच्याकडे सुरक्षेचे कुठलेही उपकरण नव्हते. त्यामुळे अशा पद्धतीचे काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा देण्याचे काम कधी होईल की प्रत्येक वेळी त्यांना आपला जीव गमवावा लागेल, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.