भंडारा - जिल्ह्याच्या अड़्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कलेवाडा येथे महिन्या भरापूर्वी दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी वनविभागाने अखेर सहा आरोपींना अटक केली आहे. जगदिश बंजारे, विजयकुमार बंजारे, ललीतकुमार बंजारे, रंजीतकुमार बंजारे, सतसागर मंडले, शितलदास कुर्रे (सर्व राहणार बिलासपुर छतीसगढ़) असे अटक करण्यात आलेल्यांची आरोपींची नावे आहेत.
हे सर्व आरोपी उल्हास हरडे यांच्या शेतात सुरू असलेल्या वीटभट्टीवर कामाकरिता आले होते. त्यांच्याकडून वनविभागाने शिकार करताना करंटसाठी वापरण्यात येणारे तार आणि वायर जप्त केले आहे. जंगलालगत असलेल्या शेतात हे सर्व राहत असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक यांनी दिली. मात्र आरोपींनी त्या बिबट्यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली गेली हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
दोन बिबट्यांच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक विहिरीत आढळून आले होते दोन बिबट्यांचे मृतदेह.15 फेब्रुवारीला कलेवाडा येथील सदानंद घोगरे यांचे शेतातील विहरीत दोन बिबट मृतावस्थेत आढळून आले होते. सुरुवातीला अपघाताने हे बिबट विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वन खात्याने व्यक्त केला होता. मात्र बिबट्याचा पाण्यात बुडून नाही तर, विष प्रयोगातून मृत्यू झाल्या असल्याची शक्यताही शवविच्छेद करणाऱ्या डॉक्टरांनी सुरुवातीलाच स्पष्ट केली होती. त्यानुसार वन विभागाने शेत मालक आणि इतर संशयित लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा करण्यात आली आणि त्यानंतर तपासाची सूत्रे फिरवत खऱ्या आरोपींना अटक केले.
दोन बिबट्यांच्या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक विजेचा शॉक देऊन हत्या-फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर आणि संशयित लोकांची चौकशी केल्यानंतर वन विभागाने अखेर 6 आरोपींना अटक केली. हे सर्व सहाही आरोपी वन विभागाच्या ताब्यात असून वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी वीटभट्टीवर काम करत होते. या लोकांनीच बिबट्यांची विद्युत शॉक लावून हत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत दोन्हीही बिबट्याचे नखे अद्यापही वनविभागाला मिळालेले नाही.
मात्र हत्येचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट-आरोपींनी बिबट्यांना विद्युत करंट लावून मारल्याचे स्पष्ट झाले असले तरी, या आरोपींनी या बिबट्यांची हत्या का केली, हे सर्व आरोपी वन्य प्राण्यांची हत्या करणारे सराईत वन्यजीव तस्कर आहेत का? हे खरेच वीटभट्टीवर काम करण्यासाठी आले की त्या क्षेत्रातील वन्य प्राण्यांची हत्या करण्यासाठी आले होते. यांनी या अगोदरही कोणत्या वन्य प्राण्यांची हत्या केली का? या दोन्ही बिबट्यांना कुठे मारण्यात आले. एकाच वेळी यांची शिकार करण्यात आली का? असे बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. वन विभागाने यांना न्यायालयात हजर केल्यावर या सहाही आरोपींना वन कोठडी देण्यात आलेली आहे.