भंडारा - लॉकडाऊन दरम्यान कंपन्यांनी त्यांच्या मजुरांना कामावरून काढू नये तसेच त्यांचे वेतनही थांबवू नये, असे आवाहन खुद्द पंतप्रधान यांनी केले होते. मात्र, असे असतानाही शासकीय कंपनी असलेल्या मॉयल ( manganese ore india limited ) ने जवळपास 500 कंत्राटी कामगारांचा पगार थांबविला आहे. माध्यमांनी विचारल्यानंतर पुढच्या दोन दिवसात त्यांना पगार देतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून सर्वात जास्त मजुरांच्या हातची कामे गेली आहेत. बऱ्याच मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशीच काही परिस्थिती भंडारा जिल्ह्यातील देशातील सर्वात मोठ्या खानीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कामगारांची आहे. चिखला येथे ही मॅगनीज खान असून लॉकडाऊन असल्याने येथील काम सुद्धा बंद आहेत. नुकतेच हे काम सुरू झाले आहे. मात्र काम बंद असल्याने मजुरांना त्यांचे वेतन देण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत, असे असतानाही या मॅगनीज खाणीत काम करणाऱ्या 500 मजुरांना कंत्राटदारांनी एकही रुपया दिला नसून जवळपास ५०० लोकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. हे मजूर कंत्राटदाराला आपले पैसे मागायला गेले की कंत्राटदार कंपनीकडे बोट दाखवितो.
कंपनीने आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुम्हाला कुठून देणार असे सांगत आहे आणि कंपनीला विचारले असता तुम्ही कंत्राटदाराला विचारा अशी उडवाउडवीची उत्तर दिली जात आहेत. या संबंधित कंपनीची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केले असता अधिकाऱ्यांनी कॅमेरा समोर न येता फोनवरच माहिती दिली आहे की आम्ही दोन दिवसात मजुरांना पैसे देऊ. माध्यमांनी विचारले तर दोन दिवसात पैसे देतो म्हणून सांगितले, मग मागील एक महिना उलटूनसुद्धा मॉयल प्रशासनाला जाग का आली नाही, असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.