भंडारा - कीटकनाशकांवर शासन घालत असलेली बंदी ही योग्य आहे. मात्र यासाठी असलेल्या पर्यायी जैविक औषधांची माहितीही शेतकऱ्यांना देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या कीटकनाशकांवर बंदी केल्यामुळे तांदूळ उत्पादनावर त्याचा प्रभाव होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. उलट जैविक कीटकनाशकांचा उपयोग केल्यास कमी खर्चाचा आणि मानवी जीवनासाठी फायद्याचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
जे कीटकनाशक मानवी जीवनासाठी हानिकारक आहेत, अशा बऱ्याच कीटकनाशकांवर जगामध्ये बंदी घातली गेली आहे. मात्र अशी कीटकनाशके आजही भारतात विकल्या जात आहेत. कीटकनाशकाचे केवळ वर्तमानातील लोकांवरच नाही तर येणाऱ्या पिढीवरही दुष्परिणाम होतात आणि त्यामुळेच हे घातक कीटकनाशके बंद करणे देशाच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. आता वापरले जाणारे बहुतांश कीटकनाशके हे विदेशातून आयात केले जातात. त्यामुळे त्यावर बंदी आणण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तसेच भारतातील रिसर्च सेंटर हवे तसे अत्याधुनिक झाले नाहीत. शेतकऱ्यांना जैविक कीटकनाशकांची माहिती पोहोचविण्यात शासकीय यंत्रणाही कमी पडत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात धोकादायक असलेले कीटकनाशके वापरतात असे परखड मत कीटकनाशक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कीटकनाशके वापरल्यामुळे त्याचे अंश तांदूळामध्ये सुद्धा जातात. तसेच जमिनीच्या खाली पाण्यामध्ये सुद्धा त्याचे अंश जातात. हे पाणी आणि तांदूळ पोटात गेल्यावर त्याचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने निर्णय घेतलेल्या कीटकनाशकांवर तात्काळ बंदी घालावी असे मत कीटकनाशक तज्ज्ञ सुधाकर धकाते यांनी व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांनाही धोकादायक असणारे कीटकनाशक नको आहे. मात्र यावर बंदी आणण्यापूर्वी जैविक कीटकनाशके कोणती आणि त्याचा वापर केव्हा आणि कधी करावा याविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. जर ही कीटकनाशके बंद झाली नाहीत, तर येणाऱ्या काळात तांदूळ निर्यात करणे कठीण होईल. कारण बहुतांश देश जैविक उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तांदळाचे जैविक उत्पादन घेण्याच्या दिशेने शासनाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनामुळे मागील तीन महिन्यात निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यांच्या धानाला यामुळे दर कमी मिळाले आहेत. तसेच भविष्यातही कोरोनामुळे भाजी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. शेतमजुरांची कमतरता सुद्धा जाणवणार आहे. त्याचा तांदूळ उत्पादनावर प्रभाव पडण्याची शक्यता शेतकऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.