भंडारा : एका प्रॉपर्टी डिलरची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना भंडारा शहरालगत असलेल्या बेला गावात सोमवारी सायंकाळी सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे भंडारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. समीर बकिमचंद दास, वय 58 वर्षे असे मृत प्रॉपर्टी डिलरचे नाव आहे. भंडारा शहरातील गेल्या 15 दिवसांतील हत्येची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शहरातील एका खाजगी कंत्राटदाराची हत्या झाली होती.
पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बेला परिसरातील राजीव गांधी नगरात समीर दास यांचा मृतदेह आढळून आला. समीर दास यांच्या मुलाचे बेला मार्गावर प्रसिद्ध श्यामसुंदर लॉन आहे. तर प्रॉपर्टी डिलिंगचा व्यवसाय करणाऱ्या समीर दास यांच्याकडे शहरालगत अनेक भूखंड आहेत. समीर दास हे कुणाला तरी भूखंड दाखवण्यासाठी रॉयल पब्लिक शाळेच्या मागे असलेल्या परिसरात गेले होते अशी माहिती मिळत आहे. मात्र ते दुपारी जेवणासाठी घरी पोहोचले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, बेला येथील राजीव गांधी नगरात एका व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी तपासणी केली असता तो मृतदेह दास यांचा असल्याचे समोर आले.
धारदार शास्त्राने वार करून केली हत्या
समीर दास यांच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या बऱ्याच जखमा होत्या. समीर दास हे प्रॉपर्टी डिलर असल्याने जमिनीच्या वादातून पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तीला ते भूखंड दाखवण्यासाठी गेले होते तो नेमका व्यक्ती कोण होता? त्यानेच समीर दास यांची हत्या केली, की हत्येमागे अजून दुसरे कुणी होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पंधरा दिवसांत हत्येची दुसरी घटना
यापूर्वी भंडारा शहरातील खाजगी कंत्राटदार भेदे यांची ही अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. आरोपींनी भेदेंकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांची हत्या केली होती. या हत्येच्या आरोपीला अवघ्या बारा तासांतच पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पंधरा दिवसांत हत्येच्या दोन घटना घडल्याने भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.