भंडारा - दारू दिली नाही म्हणून किंवा दारूसाठी मारहाण केल्याचे आपण बरेचदा ऐकले असेल. मात्र, भंडारा जिल्ह्यात काही लोकांना खर्याचे (मावा) व्यसन इतके जडले आहे की, खर्रा दिला नाही म्हणून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचे डोके फोडल्याचा प्रकार कोंढी या गावात घडला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार करून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. अश्विन भोंडेकर (वय ३५) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, लव बागडे (वय २५) असे डोक्यावर वार करणाऱ्याचे नाव आहे.
पूर्व विदर्भात खर्रा (मावा) खाण्याचा छंद हा माणसांनाच नाही तर, बोकडाला देखील जडला असल्याची बातमी काही दिवासांआधी वाचायला मिळाली होती. यातच, आता खर्याच्या कारणावरून जिल्ह्याच्या कोंढी गावामध्ये लव बागडे याने अश्विनच्या डोक्यावर वार केला. माहितीप्रमाणे, अश्विन हा गावातील ग्रामपंचायत जवळून घरी जात असताना आरोपी लव याने अश्विनला खर्रा मागितला. मात्र, अश्विनने 'मी खर्रा खात नाही आणि कुणाला खाऊही घालत नाही' असे उत्तर दिले. यावरून लवने अश्विनशी भांडण केले. या भांडणात लव आणि अश्विनमध्ये मारामारी सुरू झाली. दरम्यान, लवने रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड उचलत अश्विनच्या डोक्यात घातला आणि तिथून पळ काढला.
हेही वाचा - भंडारा : कडाक्याच्या थंडीने चौघांचा मृत्यू
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अश्विनला ग्रामस्थांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. यानंतर, लवविरूद्ध अश्विनने जवाहर नगर पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत.
एकीकडे सरकार गुटखा, खर्यासारख्या घातक पदार्थांवर बंदी घालत असताना याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. खर्याने कर्करोगाच्या आजारात वाढ झाली असून याबाबत नेहमी जागरूकता केली जाते. मात्र, भंडारा जिल्ह्यतील लोकांमध्ये या खर्राचे व्यसन इतके वाढले आहे कि, यातून गुन्हे देखील घडायला सुरुवात झाली आहे. त्याचेच हे एक ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.
हेही वाचा - हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यात पोलीस एक नंबर!