भंडारा - अशोक लेलँड कंपनीद्वारे केलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील राजेगावमधील गावकऱ्यांनी १ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. आज उपोषणाचा सहावा दिवस असून प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या समर्थनार्थ तृतीयपंथीयांनीही रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला.
भंडारा जिल्ह्याच्या राजेगाव अंतर्गत चिखली येथे अशोक लेलँड कंपनीने १९८२ पासून २६ एकर जमिनीवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण जमिनीवर कंपनीने पक्के बांधकाम केले आहे. वारंवार पत्र देऊनही कोणतीही दखल कंपनीने न घेतल्याने त्यांच्या विरोधात भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली आहे. परंतु, आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई त्या कंपनीवर झाली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेगाव येथील गावकऱ्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस असूनही प्रशासन कोणतीही भूमिका घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या समर्थनार्थ तृतीयपंथीयांनी आंदोलनस्थळी आपल्या विशिष्ट पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. जिल्हाधिकारी चौकात रस्त्याच्या मधोमध बसून काही काळ चक्काजाम आंदोलनही केले.
तृतीयपंथीयांनी जिल्हा प्रशासनाला १ तासाचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बैठकीसाठी बोलवून घेतले. या बैठकीदरम्यान गुरुवारपर्यंत ठोस भूमिका घेऊन अशोक लेलँडचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिल्यानंतर तृतीयपंथीयांनी आंदोलन मागे घेतले.
आपल्या देशात स्त्रियांना मोठा मान दिला जातो. त्यांच्या प्रगतीसाठी शासनाने ५० टक्के आरक्षणही दिले आहे. मात्र, मागील ६ दिवसांपासून येथील महिला उपोषण करीत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच आम्ही त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्याचे तृतीयपंथीयांनी सांगितले.
या अगोदरही यासंदर्भात अनेकवेळा मोर्चे आणि आंदोलने केली आहेत. प्रत्येक वेळेस कारवाईचे खोटे आश्वासन दिल्यामुळे गावकरी महिलांनी आमरण उपोषणाचे हत्यार उचलले आहे. जोपर्यंत अशोक लेलँड कंपनीवर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला आहे.