भंडारा - तुमसर तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले. वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. वाघाला बेशुद्ध करून पकडण्याची परवानगी वनविभागाला मिळाली असून यासाठी वन विभागाने पाच पथके तयार केली आहेत.
वाघाने शनिवारी बिनाखी गावात हल्ला करून तीन लोकांना जखमी केले होते. त्यानंतर वन विभागाने आणि गावकऱ्यांनी त्याला जंगलाच्या दिशेने पळवले. मात्र, तरीही या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणा दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली जगत असून दिवसाही शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.
हेही वाचा - विदेशी पर्यटकांनी भारतीयांसमोर ठेवला अनोखा आदर्श
रविवारी सायंकाळी पुन्हा बिनाखी गावाच्या शिवारात हा वाघ शिरल्याची माहिती मिल मालक अनिल रहांगडाले यांनी वनविभागाला दिली. परंतु, कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केले. लवकरात लवकर वाघाला पकडण्याची आणि जखमींना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
जवळपास दहा दिवस अगोदर गोंदेखारी गावाशेजारी हा वाघ पहिल्यांदा दिसला होता. तेव्हा गावकऱ्यांनी आणि वन विभागाने वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. तो जंगलात गेला असेल, असे वनविभागाला आणि गावकऱ्यांना वाटले होते. मात्र, हा वाघ जंगलात न जाता बपेरा, बिनाखी महालगाव या परिसरात फिरत होता. शनिवारी बिनाखी गावाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकवर वाघाने हल्ला चढवला. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकातील एकावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या धाडसामुळे वाघ तिथून जंगलाच्या दिशेने पळाला. मात्र, अजूनही या परिसरात त्याच्या पाऊल खुणा दिसत आहेत.
वाघाला बेशुद्ध करण्याची परवानगी मिळाल्याने वन विभागाने 5 पथकांसह वाघाचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो पकडला जात नाही तोपर्यंत या परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत कायम राहणार आहे.