भंडारा - जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व पॉझिटिव्ह रुग्ण लाखनी तालुक्यातील आहेत. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 58 झाली आहे. यातील 41 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
4 जूनला 29 वर्षीय तरुण हा चेन्नई येथून, पंचवीस वर्षीय तरुण (नाशिक), 42 वर्षीय पुरुष हा (चेन्नई), 5 जूनला बंगळुरुवरून एक 45 वर्षीय व्यक्ती आणि 6 जूनला पुणे येथून 28 वर्षीय व्यक्ती लाखनी तालुक्यात दाखल झाले होते. या सर्वांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी 16 जूनला नागपूर येथे पाठविण्यात आले होते. आज या पाचही व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील 3055 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 58 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2993 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. चार नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. सध्या आयसोलेशन वार्डमध्ये 14 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 414 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 378 भरती आहेत. आतापर्यंत 2256 व्यक्तींना इनस्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 42343 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 36629 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 5713 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.