भंडारा - २०२१च्या जानेवारीमधील दुसरा शनिवार १० कुटुंबांसाठी काळा दिवस म्हणून उगवला. काही दिवसांपूर्वी याच कुटुंबांमध्ये नवीन सदस्यांचे आगमन झाले म्हणून आनंदीआनंद होता. मात्र, आज (शनिवार)त्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागली. या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी मध्यरात्री दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्नमधील सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला.
माझे बाळ मला परत द्या - सुकेशनी आग्रे
सुकेशनी आग्रे यांना १२ दिवसांपूर्वी मुलगी झाली होती. तुमसरमध्ये त्यांनी मुलीला जन्म दिला होता. घरात कन्यारत्न आले म्हणून सर्वजण आनंदी होते. मात्र, बाळाचे वजन कमी असल्याने बाळाला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तिथे बाळाला लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ठेवले गेले व सुकेशनी यांना सामान्य वार्डमध्ये ठेवले. शनिवारी पहाटे आग लागल्यानंतर सुकेशनी यांना बाळ गेल्याचे समजले. त्यांनी बाळ देण्याची वारंवार मागणी केली. मात्र, शवविच्छेदन केल्यानंतरच बाळ दिले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. आपले बाळ आपल्याला परत द्यावे, असा आक्रोश सुकेशनी यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी माझे बाळ व्यवस्थित होते - मोहना
याच कक्षात रावणवाडी येथील मोहना यांचेही बाळ होते. ३ जानेवारीला त्यांनी बाळाला जन्म दिला होता. बाळाचे वजन कमी असल्याने बाळाला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते. आज मध्यरात्री लहान मुलांच्या अतिदक्षता विभागातून धूर येत असल्याचे समजले. त्यांनी लगेच बाळाकडे धाव घेतली. मात्र, त्यांना बाळ दिले गेले नाही. घटना घडल्यानंतरही त्यांना बाळ दाखवले गेले नाही किंवा त्याबाबत माहितीही दिली नाही. 'दोन दिवसांपूर्वी माझे बाळ एकदम व्यवस्थित होते. मी स्वत: त्याला दूध पाजण्यासाठी जात होते', असे मोहना यांनी सांगितले.
माझी मुलगी रुग्णालय प्रशासनाची बळी -
परसोडी येथील एका शेतमजूराची देखील मुलगी लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात दाखल होती. लागलेल्या आगीने त्यांच्या मुलीलाही आपल्या कवेत घेतले. रुग्णालय प्रशासन त्यांना मुलीचे शवही देत नसून, त्यासाठी त्यांना या कक्षातून त्या कक्षात फिरवले जात आहे. ही घटना केवळ रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप या पीडित पालकांनी केला आहे.