भंडारा - जिल्ह्यामध्ये येण्यासाठी तब्बल 8 हजार लोकांनी नोंदणी केली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक आल्यास प्रत्येकाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करणे शक्य नाही. त्यामुळे, यापुढे रेड झोनमधील प्रत्येक व्यक्तीला परवानगी न देता अत्यावश्यक वाटणाऱ्या लोकांनाच परवानगी द्यावी, अशी विनंती रेड झोनमधील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.
शनिवारी पुण्यावरून आलेले दोन लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. यानंतर भंडारा जिल्हाधिकारी यांनी यापुढे रेड झोनमधून येणाऱ्या लोकांच्याबाबतीत नियम अधिक कडक करीत रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रेड झोनमधून अत्यावश्यक वाटत आहे त्यांनाच परवानगी देण्यात यावी असे पत्र रेड झोनमधील 11 जिल्हाधिकारी यांना लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
8 हजार लोकांना परवानगी मिळाल्यास जवळपास 15000 लोक येण्याची शक्यता आहे. हे जिल्ह्यासाठी धोक्याचे आहे. त्यामुळेच, जिल्हाधिकारी यांनी हे निर्णय घेतले आहेत. भंडारा जिल्ह्यात 26 लोक आयसोलेशन वार्डात असून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 156 लोक आहेत.
16 मे रोजी 63 लोकांचे घशाचे नमुने तपासणी करता नागपूर महाविद्यालयात पाठविले आहेत. आतापर्यंत 817 लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून 717 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 97 अहवाल अप्राप्त आहेत. 3 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह असून 1 रुग्ण बरा झाला आहे. तर, 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.