भंडारा - कोरोनाचे प्रादुर्भाव थांबविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मात्र, तीन कर्मचाऱ्यांनी कामात निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांच्याविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहाडी तालुक्यातील कोरोना विषाणू रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच संबंधित आजाराचे नियंत्रण व उपाय योजना करण्याकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या आजाराबाबत घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करण्याकरिता तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तसेच आशा सेविका यांची गावनिहाय समन्वयक समिती व पथक गठित करण्यात आलेली आहे. सदर भेटीदरम्यान कोरोना रोगाचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मोहाडी येथे क्वारंटाईन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
या कक्षात एक नियंत्रण अधिकारी आणि दोन सहकारी नेमण्यात आले होते. रविवारी या क्वारंटाईन कक्षात तहसीलदार यांनी भेट दिली तेव्हा नियंत्रण अधिकारी असलेले मोहाडी पंचायत समितीमध्ये कार्यरत आर बी दिपटे हे गैरहजर होते. तर जिल्हा परिषद करडी येथे शिक्षक असलेले एस. डी. आडे आणि जिल्हा परिषद, आंधळगाव येथे कार्यरत आणि क्वारंटाईन कक्षात नियुक्ती असलेले हे दोन्ही शिक्षक त्याच क्वारंटाईन कक्षात झोपलेले होते. त्यामुळे या तिन्ही लोकांवर कामात निष्काळजीपणा आणि कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार तसेच भारतीय दंड संहिता 1800 (45) कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र अपराध केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार मोहाडी येथील तहसीलदार धनंजय देशमुख यांनी केली आहे.