भंडारा - कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा किटचे वाटप शुक्रवारपासून बंद करण्यात आले आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कामगार कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण करून ऑफिसची तोडफोड केल्यानंतर किट वाटप प्रक्रिया बंद करण्यात आली. यामुळे जिल्हाभरातून किट घेण्यासाठी शहरात दाखल झालेल्या कामगारांना मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे. आमदार भोंडेकरांनी कामगारांची गैरसोय होत आहे असे सांगून केलेल्या आंदोलनानंतर कामगारांचा त्रास वाढला आहे.
सुरक्षा किट वाटपादरम्यान योग्य नियोजना अभावी लांबून आलेल्या कामगारांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गुरुवारी साई मंगल कार्यालयात जाऊन किट वाटप करणाऱ्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या नोंदणी अधिकाऱ्याला मारहाण केली. तसेच कार्यालयाची तोडफोडही केली. याप्रकरणी संबंधिक कर्मचाऱ्यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. तसेच शुक्रवारी मारहाणीच्या घटनेचा या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला.
आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मागणी होती की, सुरक्षा किट वाटप हे प्रत्येक तालुक्यातून व्हावे, या साठी प्रत्येक तालुक्यात एक नोंदणी अधिकारी असावा. मात्र सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय भंडारा इथे सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, किमान वेतन निरीक्षक, दुकाने निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, टंकलिखित, शिपाई अशीच सर्वोच्च पदे रिक्त आहेत. त्यामुळे ३० हजार नोंदणीकृत कामगारांना किट वाटप करण्यासाठी प्रशासन हतबल होते. मात्र, प्रशासाने किट वाटण्यासाठी कंत्राट दिले होते. याची कल्पना असतानाही भोंडेकरांची भूमिका केवळ विधान सभा डोळ्यापुढे ठेवून केलेले शक्तिप्रदर्शन आहे, की कामगारांचे प्रश्न सोडविण्याची हा प्रश्न निर्माण झाला आहे.