भंडारा - 23 तारखेच्या निकालानंतर भंडारा जिल्ह्यात एकाच चर्चेला उधाण आले आहे. ते म्हणजे विजयी उमेदवार सुनील मेंढे यांना तब्बल 1 लाख 97 हजार मताने विजय मिळालाच कसा, कारण उमेदवार आणि कार्यकर्ते दोघांना 50,000 ते 1 लाख मताने विजयी होऊ असे अंदाज होता. थोड्याफार फरकाने का होईना आम्हीच जिंकू, असा विश्वास राष्ट्रवादी पक्षाला होता, मात्र भाजप आणि राष्ट्रवादी यांचे गणित चुकीचे ठरवत निकालाने सर्वानाच आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
गुरुवारी 23 मे रोजी झालेल्या लोकसभेच्या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या सुनील मेंढे यांनी आघाडी घ्यायला सुरू केल्याने हे स्पष्ट होत गेले की, भाजपचे सुनील मेंढे हे विजयी होणार. सायंकाळी विजयाची रॅली काढली गेली. मात्र, किती मतांनी विजय झाला हे समजण्यासाठी रात्री अडीचपर्यंत वाट पाहावी लागली. निर्णायक आघाडी पुढे आल्यावर खुद्द भाजप उमेदवार आणि कार्यकर्ते यांना त्या आकडेवारीवर विश्वास बसला नाही. तब्बल 1 लाख 97 हजार मतांनी मेंढे यांचा विजय झाला होता. तेव्हापासून जिल्ह्यात एकच चर्चा आहे? हे कसे शक्य झाले, जवळपास 2 लाख मताधिक्यांनी मेंढे निवडून कसे आले.
11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले त्यानंतर तब्बल 43 दिवसांनी मतगणना होणार होती, 14 उमेदवार रिंगणात असले तरी सरळ लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाच्या उमेदवारांमध्येच होती. त्यामुळे कुठे किती मतदान झाले असेल याची गोळाबेरीज लावण्याचे काम दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी सुरू केले.
भंडारा-गोंदिया लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी भंडारा, तुमसर, साकोली, तिरोडा, मोरगाव अर्जुनी या 5 विधानसभा जागेवर भाजपचे आमदार आहेत. गोंदियामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जातीनिहाय किती मतदार आहेत, त्यांची मते कोणाला मिळाली याचे सर्वेक्षण झाले. या सर्वेमध्ये दोन्ही पक्षाला जिंकण्याची आशा निर्माण झाली. मात्र, विजयाचा फरक कमी असेल, असे अंदाज बांधण्यात आले तशी माहिती वरिष्ठांना दिली. मात्र, 23 तारखेला पहिल्याच फेरीत भाजपच्या सुनिल मेंढे यांना 7 हजार मतांची आघाडी घेतली आणि ही आघाडी 33 फेऱ्यांपर्यंत कायम राहत सतत वाढत गेली आणि तब्बल 1 लाख 97 हजार 394 मतांवर जाऊन थांबली.
सर्वेनुसार भंडारा शहरात भाजपमागे राहील, 50 हजार ते 1 लाखपर्यंत विजय लीड राहील, काही सर्वेनुसार 30 हजार ते 50 हजारच्या आघाडीने सुनील मेंढे निवडून येतील तर काहींच्या मते नाना पंचबुद्धे निवडून येतील असा अंदाज होता. मात्र, तब्बल 2 लाखाच्या मताधिक्याने सुनील मेंढे निवडून येतील असे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला वाटत नव्हते. किंबहुना तशी परिस्थिती दिसत नव्हती, मग हा चमत्कार झाला कसा, का भाजपा आणि राष्ट्रवादीचे गणित बिघडले आणि तेही येवढ्या मोठ्या प्रमाणात, सध्या संशोधनाचा विषय भंडाऱ्याच्या सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय लोकांसाठी बनला आहे.
याविषयी भाजप पदाधिकाऱ्यांना विचारले असता लोकांनी मतदान केल्यानंतर उघडपणे सांगितले नाही, त्यामुळे आमचे गणित बिघडले. मात्र, लोकांना एक स्थिर सरकार हवे असल्याने लोकांनी आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे, अशी प्रतिक्रिया दिली. गरीब लोकांसाठी मोदी सरकारने योजना अमलात आणल्या, त्याचा फायदा भाजपाला झाला. त्यामुळे जातीय समीकरणे विसरून सर्व जातीतील लोकांनी यावेळी भाजपला मतदान केल्यामुळे अनपेक्षित निकाल पुढे येत तब्बल दोन लाख मतांनी सुनील मेंढे निवडून आले अशी प्रतिक्रिया स्थानिक पत्रकारांनी दिली.