भंडारा - राज्य पोलीस कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या काळात आणि बंदोबस्ताच्या वेळी जुन्या टोपीमुळे अनेकदा अडचणी निर्माण होत असे, त्यामुळे पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन पद्धतीच्या टोपीचा पर्याय दिला आहे.
पोलीस म्हटले की खाकी रंगाचा ड्रेस आणि डोक्यावर निळ्या रंगाची लांब टोपी घातलेली व्यक्ती डोळ्यांपुढे येतो. मधल्या काळात पोलिसांचा ड्रेस बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, तसे काही झाले नाही. आता पोलिसांचा ड्रेस जरी बदलला नसला तरी त्यांच्या टोप्या बदलण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना या नवीन पद्धतीच्या टोप्या वापरण्यासाठी दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मंगळवारपासूनच या नवीन पद्धतीच्या टोप्या वापरण्यासाठी दिल्या गेल्या आहेत. गर्द निळ्या रंगाच्या टोपीच्या एका बाजूला जिल्ह्याचे नाव असेल तर पुढच्या बाजूला महाराष्ट्र पोलीस असे लिहिलेले असेल.
पोलिसांची जुनी टोपी ही लांब पद्धतीची होती ही टोपी बंदोबस्ताच्या वेळेस वापरण्यास आणि तिला सांभाळण्यात खूप अडचण व्हायची. नव्या टोपीमुळे बंदोबस्ताच्या वेळेस वापरण्यास सोपे जाईल आणि या टोपीमुळे उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्यावर येणाऱ्या उन्हापासून संरक्षण मिळेल. त्यामुळेच या नवीन पद्धतीच्या टोपीची पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवड करण्यात आली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने पोलिसांना आधुनिक टोपी मिळाली त्याच पद्धतीने सध्या असलेल्या ड्रेसमध्येही बदल घडवून, भर उन्हात काम करताना वापरण्यास सोयीस्कर होईल, असा ड्रेस आणावा अशी अपेक्षा पोलीस कर्मचारी करीत आहेत.