भंडारा - स्थानिक प्रशासनाने घेतलेला अजब निर्णय भंडारा शहरातील नागरिकांना पचनी पडत नाही आहे. सोमवार पासून भंडारा शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजता बंद होणार होती. मात्र, दारूची दुकाने सायंकाळी सात नंतरही सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिक संतापले आहेत. चहाच्या टपरीवर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र, दारूच्या दुकानावर कोरोना वाढत नाही का असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
चहा बंद आणि दारू सुरू -
सोमवारपासून सुरू झालेल्या नवीन वेळेनुसार सायंकाळी सात नंतर भंडारा शहरातील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याच वेळेस दारूची दुकाने सुरू दिसली. एवढेच नाही तर या दारूच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी ही दिसून आली. कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा या दृष्टीने चहाची टपरी सुद्धा बंद करण्यात आली मात्र दारू दुकानावर असलेली गर्दी बघता या लोकांना कोराना होणार नाही का? यांच्यापासून संसर्ग वाढणार नाही का?, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. चहाची दुकाने बंद आणि दारूचे दुकान सुरू हा कसला नियम हा नियम बदलून दारूची दुकाने ही बंद करावीत अशी मागणी नागरीक करत आहेत.
सात नंतर बाजारपेठा बंद करण्यासाठी खुद्द मुख्याधिकारी फिरले रस्त्यावर -
भंडारा शहरात कोरोनाच्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 ही नवीन वेळ बाजारपेठेसाठी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी या नियमांचे पालन करावे हे सांगण्यासाठी भंडारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वतः त्यांच्या चमू सह रस्त्यावरून पायी फिरून ज्या दुकानदारांनी दुकाने बंद केली नाही त्यांना दुकाने बंद करण्याची विनंती करीत होते. आज आम्ही व्यापारांना विनंती करीत आहोत. मंगळवार पासून जर त्यांनी नियमाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.
राज्य अबकारी विभाग नगर पालिकेच्या अधिपत्याखाली येत नाही -
शहरातील बाजार पेठे 7 वाजे नंतर बंद ठेवावी हा निर्णय भंडारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी घेतला. मात्र, राज्य अबकारी विभाग त्यांच्या अधिपत्याखाली येत नाही त्यामुळे दारू दुकाने बंद करण्याचे आदेश नगर पालिका देऊ शकत नाही. हा आदेश जिल्हाधिकारी अबकारी विभागाला देऊ शकतात असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या नंतर ही प्रश्न निर्माण होतो की मागच्या वर्षी ही तुम्ही बाजार पेठाची वेळ ठरवून दिली होती आणि तेव्हाही सुरवातीला हाच घोळ घातला होता. माध्यमांनी बातम्या लावल्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दारूची दुकानेही बाजारपेठांच्या वेळेवर बंद केली होती. मागच्या वर्षीचा अनुभव तुमच्या पाठीशी असूनही या वर्षी तोच घोळ का केला. आता तरी ही चूक सुधारून शक्य तेवढ्या लवकर दारू दुकानही 7 वाजेला बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांन मार्फत काढावा, अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू होती.