भंडारा - योग्य औषधोपचार करून रुग्णांना रोगमुक्त करणाऱ्या एका डॉक्टरने चक्क कोमात गेलेल्या विहिरीला बरे केले आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांनी शंभर वर्षे जुन्या आणि कोरडी पडलेली विहिर पाण्याने तुडुंब भरली आहे. त्यांच्या मदतीला त्यांचा एक मित्रसुद्धा धावून आला आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या खोकरला गावात नव्याने बनलेल्या व्यंकटेश सिटीमध्ये राहणाऱ्या डॉक्टर विनोद देशमुख आणि विधान सरकार या दोन मित्रांनी त्यांच्या इमारतीपासून 200 मीटर अंतरावर असलेल्या एका 100 वर्ष जुन्या विहिरीत जल पुनर्भरण केले आहे.
पाणी हा विषय खरे तर सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. दररोज असंख्य कामांसाठी प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता भासते. मात्र, पाणी संवर्धन करण्यासाठी खूप कमी लोक पुढाकार घेतात. भंडाऱ्यातील देशमुख डॉक्टर आणि त्यांच्या एका मित्राने परिश्रम करून शंभर वर्षाहून अधिक काळापासून कोरड्या पडलेल्या विहिरीला जिवंत केले आहे. दरवर्षी पावसाळ्यात भंडाऱयात भरपूर पाऊस पडतो. सर्वच पाणी जमिनीत न मुरता लाखो लिटर पाणी वाहून जाते. उन्हाळ्यात 400 फुटांहून अधिक खोल खोदूनही कुपनलिकेला पाणी लागत नाही. ही विसंगती लक्षात घेऊन डॉ. देशमुखांनी स्वतःच हातात कुदळ घेऊन विहिरीला जोडणारी एक नाली खोदण्याचे काम सुरू केले. त्यांना हे काम करताना पाहून त्यांच्या शेजारी राहणारे विधान सरकार हे देखील मदतीला आले.
डॉ. देशमुख आणि विधान सरकार यांनी दररोज सकाळी 2 तास परिश्रम करून जवळच असलेल्या विहीरीला जोडणारी नाली खोदली. पावसाळ्यात परिसरात साचलेल्या पाण्याचा प्रवाह या नालीच्या माध्यमातून विहीरीत गेला आणि कोरडीठाक पडलेली विहिर हळुहळू भरू लागली. आजपर्यंत पडलेल्या पावसामुळे ही विहीर 100 टक्के भरली आहे. कधीकाळी केवळ कचराकूंडी असा उल्लेख केली जात असलेली ही विहिर आज खऱ्या अर्थाने ‘विहिर’ म्हणण्याच्या योग्यतेची झाली. तुडूंब भरलेल्या या विहिरीमूळे जमिनीत पाणी मुरूण भुर्गभातील पातळी वाढेल आणि पर्यायाने पाणी संकट काही अंशी का होईना कमी होईल, असा आशावाद डॉ. देशमुखांनी व्यक्त केला.