भंडारा - जिल्ह्यात सापडलेला एकमेव कोरोना रूग्ण बरा होण्याच्या मार्गावर आहे. या रुग्णाला आता 14 दिवस झाले असून लवकरच त्याचा दुसरा अहवाल येणार आहे. हा दुसरा अहवाल निगेटिव्ह येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या रुग्णाला कोरोनाची बाधा कोणामुळे झाली हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
भंडारा जिल्हा सध्या कोरोनाच्या ऑरेंज झोनमध्ये आहे, कारण भंडाऱ्यात कोरोनाचा एक रूग्ण आहे. या महिला रुग्णाला टीबी झाला असून त्याचा उपचार घेण्यासाठी ही व्यक्ती नागपूरवरून भंडारा जिल्ह्यात आली होती. महिन्याभरापासून टीबीचा उपचार सुरू असतानाच 23 एप्रिलला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने या महिलेला कोरोना वार्डमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचे वैद्यकीय नमुने तासणीसाठी नागपूरला पाठवण्यात आले. 27 तारखेला ही 45 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या 150 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यातील हाय रिक्स असलेल्या 50 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले होते. या सर्वजणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण कोणामुळे झाली या प्रश्नांचे उत्तर आरोग्य विभागाला अद्याप सापडले नाही.
या सर्व प्रक्रियेत भंडारा जिल्ह्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले 560 पैकी 559 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. फ्ल्यू ओपीडीमध्ये तीव्र श्वसनाचा त्रास असणाऱया 114 व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 111 व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील बरेच रुग्ण हे नागपूरमधून आले होते. सध्या आयसोलेशन वार्डमध्ये सहा लोक भरती असून आत्तापर्यंत 188 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.