भंडारा - लाखांदूर, पवनी तालुक्यात वादळ वाऱ्याच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यावेळी वीज पडून 15 शेळ्या आणि तीन म्हशींचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनेतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसाने वादळ वाऱ्यासह रात्री 12 वाजताचे दरम्यान तालुक्यात हजेरी लावली. पाऊस थोड्या वेळच आला, पण पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथील शेतकरी सहादेव परसराम मेडवाडे यांच्या शेतातील म्हशींवर वीज पडल्यामुळे तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची अंदाजे किमत 1 लाख 25 हजार आहे. सदर शेतकरी हा अल्पभूधारक असून वीज पडून म्हशी ठार झाल्याने त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.
दुसरी घटना लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार ( किन्ही ) गावात घडली. यात शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. सध्या खरीप हंगामपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली असून लेंडी खतासाठी शेतात शेळ्या बसविण्याची जुनी पद्धत गावात अजुनही आहे. त्यानुसार विश्वपाल भेंडारकर यांनी जयपूर बारव्हा येथून 375 शेळ्या लेंडी खतांसाठी बोलावल्या होत्या. मात्र, काल झालेल्या विजेच्या गडगडाटात अवकाळी पावसात वीज पडून 15 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात हिरालाल ठाकरे, उत्तम कोरे, निलेश गोमासे, नागोसे, पंधरे आदी शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.