भंडारा - नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले आहे. काही वर्षांपूर्वी बनवलेला नाला तोडून पुन्हा १४ लाख रुपये खर्चुन नवीन नाला बनवण्याचे काम सुरू झाले आहे. याविषयी वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतर नगरपालिका आता सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
भंडारा नगरपरिषदेपासून ५० मीटर अंतरावर असलेल्या चौकातून या नाल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. हा नाला दोन टप्प्यांमध्ये बनलेली आहे. त्यामधील पहिला टप्पा १०, दुसरा टप्पा हा ४ वर्षांपूर्वी बनलेला आहे. नाला अजूनही सुव्यवस्थित आहे. त्याच्यावर बसवलेले झाकण देखील सुव्यवस्थित होते. मात्र, तरीही नवीन नाला बनवण्याच्या नावाखाली 14 लाख रुपयांचे नवीन काम सुरू केले आहे. यासाठी जुना नाला तोडून त्याठिकाणी पुन्हा नवीन नाला बनविण्यास सुरुवात झाली. याविषयी मुख्याधिकारी आणि अभियंत्यांना प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, सारवासारव करत संपूर्ण नाला तोडल्या जाणार नाही. नाला तुटलेल्या ठिकाणचे काम केले जाईल, असे उत्तर दिले. त्यामुळे काही ठिकाणी काम करायचे होते, तर संपूर्ण नाल्यावरचे झाकण का काढले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे वाचलं का? - सातारा : दहिवडीत विहिरीत पडलेल्या बैलाची सहा तासानंतर सुटका
शहरात बऱ्याच ठिकाणी नाला नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचत असते. तसेच सांडपाण्याची समस्या देखील निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. अशा ठिकाणी नाला बनवण्याचे काम करण्यापेक्षा जुन्या नाल्याच्या ठिकाणी पुन्हा नाला बनवण्याचे काम नगरसेवक आणि कंत्राटदार करीत आहेत.
नगरपरिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली होती. सत्ताबदल झाल्यामुळे भंडारा नगरपरिषदेमध्ये भ्रष्टाचार कमी होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात जुन्या सत्ताधाऱ्यांप्रमाणेच नवीन सत्ताधारी देखील भ्रष्टाचार करणार आहेत काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.