भंडारा - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली. SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्या पैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले आहे.
धुरामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज
शनिवारी रात्री अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. कामावर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवले गेले. मात्र तरीही धुर मोठ्या प्रमाणात होता.
७ बालकांना वाचवण्यात यश
या विभागामध्ये आऊट बॉर्न आणि इन बॉर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बॉर्न मधील असलेले सात बालके सुखरूप आहेत. तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 बालंकांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.
अन्य रूग्णांना हलवले
आग लागली तेव्हा रूग्णालयात अन्य रूग्ण ही मोठ्या प्रमामात होते. त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे ही जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले. आग नक्की कशामुळे लागली या बाबत चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - ट्रम्प यांनी 'रिपब्लिकन' नावाचा अवमान केला, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा करेन - आठवले