बीड - घरातील सततच्या कुरबुरीवरून बीड तालुक्यातील कामखेडा येथील 33 वर्षीय विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी लिहिली असून त्याने हातावर देखील काही मजकूर लिहिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नीसह सहा जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल अशोक जमदाडे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा... 'शेट्टी साहेब उमेदवारी स्वीकारा अन्यथा...' स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून मोठा इशारा
अनिल जमदाडे याचे बीएडपर्यंत शिक्षण झाले होते. मात्र, नोकरी न लागल्याने तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवत होता. त्याचा विवाह बीड तालुक्यातील काठोडा येथील एका मुलीशी झाला. या उभयंतांना दोन मुलीही आहेत. दरम्यान, पती-पत्नीत मागील काही वर्षांपासून सातत्याने वाद होत होता. अनिल याला दारुचे व्यसन लागल्याने हा वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सततच्या वादाला कंटाळून काही दिवसांपासून पत्नी माहेरी गेली होती. बुधवारी रात्री अशोकने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक सुसाइट नोट लिहून ठेवली असून यात पत्नीसोबत वाद काय होता, याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, त्याने वडिलांना उद्देशून 'नाना, दादा मुलींना सांभाळा' मिस यू डॅड, मॉम असेही लिहिले आहे. असाच काहीसा मजकूर त्याने स्वत:च्या हातावरही लिहिल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले.
सदर घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेहाची जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
हेही वाचा... 'कोरोना'मुळे नाभिक समाजांचा व्यावसाय 'लॉकडाऊन'; परभणीतील व्यावसायिकांवर आली उपासमारीची वेळ
सहा जणांवर गुन्हा दाखल...
'पत्नीशी असलेल्या भांडणामुळे पत्नीला शेतीत येऊ देऊ नका' असे अनिल जमदाडे याने सुसाइट नोटमध्ये लिहिल्याची माहिती मिळाली दिली. दरम्यान, कामखेडा येथे अनिल जमदाडे याच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिलच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात अर्चना अनिल जमदाडे, अर्चनाचे नातेवाईक अंकुश मस्के, रणजित मस्के (दोघे रा. कामखेडा ता. बीड) दीपक जगताप (रा. अंबिका चौक, बीड) अर्जुन नवले, शुभम नवले (दोघे रा. एमआयडीसी, बीड) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अर्चनाच्या नातेवाईकांनी देखील तो पत्नीशी भांडतो म्हणून मारहाण करुन त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.