बीड - वडिलाच्या भविष्य निर्वाह निधीचे उर्वरीत पैशाची मागणी करत दोन भावांनी जन्मदात्या आईला पेट्रोल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी संतोष व नितीन कुचेकर, या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयाने 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील कानडी माळी येथील इंदुबाई लालासाहेब कुचेकर (वय 50 वर्षे) यांचे पती लालासाहेब हरीभाऊ कुचेकर हे 2005 मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाईपदी कार्यरत असताना ते अचानक बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार परळी शहर पोलीस ठाण्यात इंदुबाई यांनी दिली होती. पण, त्यांचा शोध न लागल्यामुळे 2013 मध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. पतीच्या नोकरीच्या कालावधीतील भविष्य निर्वाह निधी 13 लाख 84 हजार रुपयांची रक्कम इंदुबाई यांना ऑगस्ट,2018 मध्ये मिळाली. त्यांनी या रकमेतील 9 लाख 84 हजार रुपये संतोष व नितीनला बोलावून दिले. मात्र, संतोष व नितीन हे दोन भाऊ कानडीमाळी येथे आई राहत असलेल्या घरी येऊन पैशाची मागणी करू लागले. पैसे न दिल्यास त्यांनी इंदुबाई यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इंदुबाईंनी गावातील माणसे गोळा करून मी तुम्हाला पैसे देवून टाकते असे सांगितल्यावर दोघे जण निघून गेले होते.
शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संतोष व नितीन परत आले. वडिलांच्या भविष्य निर्वाह निधीचे राहिलेल्या पैशाची मागणी करू लागले. यावेळी संतोष याच्या हातात पेट्रोलची बाटली असल्याने इंदुबाई या घराबाहेर येऊन रस्त्यावर उभ्या राहिल्या. त्यानंतर दुसरा मुलगा नितीन याने संतोषला आईच्या अंगावर पेट्रोल टाक असे म्हणत आईला आजच जिवंत जाळून टाकू असे म्हणाल्याने इंदुबाई या भावजई रमलबाई कान्हु खाडे यांच्या घराकडे पळू लागल्या; मात्र, दोन्ही मुलांनी पाठलाग करत आईला धरून संतोष याने त्याच्या हातातील बॉटलमधील पेट्रोल आईच्या अंगावर टाकले व नितीन याने काडी पेटवून आईच्या अंगावर फेकणार तेवढ्यात गावचे सरपंच अमर राऊत यांनी नितीनच्या हातावर मारून पेटलेली काडी बुजवली. यामुळे इंदूबाईचा जीव वाचला.
याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात इंदुबाई लालासाहेब कुचेकर यांच्या तक्रारीवरून संतोष लालासाहेब कुचेकर व नितीन लालासाहेब कुचेकर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी (दि. 4 ऑक्टोबर) केज न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - विवेकची आत्महत्या आरक्षणासाठी नाही; 'ती' चिठ्ठी बनावट असल्याचा पोलिसांकडून खुलासा