बीड - तालुक्यातील माळापुरी येथील वाकी नदीचा वरच्या बाजुला अधिक पाऊस झाल्याने नदीला पूर आला. या पुरामध्ये शेतकरी अकबर बेग यांची बैलगाडी वाहून गेली. तसेच यात त्यांचा एक बैलदेखील पाण्यात बुडून मेला. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी अकबर बेग यांनी केली आहे.
शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसामुळे बीड तालुक्यातील माळापुरी येथील वाकी नदीला पूर आला. या पुरामध्ये येथील शेतकरी अकबर बेग यांची बैलगाडी वाहून गेली असून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अकबर बेग यांच्या पत्नी शबानाबी बेग याही जखमी झाल्या. सध्या त्यांच्यावर बीड शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या पुरात अकबर बेग यांच्या बैलगाडीचे मोठे नुकसान झाले असून पाण्यात बैल वाहून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. बैलाच्या शवविच्छेदनासाठी ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय रूग्णालय, कुर्ला व पशुवैद्यकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र, संबंधितांनी बैलाचे शवविच्छेदन करण्यास असमर्थता दर्शविली. तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यासह वरिष्ठांशी संपर्क होऊ शकला नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविषयी संतापाची भावना व्यक्त केली.