बीड - शेती आणि समाजसेवेच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची संपत्ती कोट्यावधी रुपयांची घरात आहे. पंकजा यांची पाच कोटी 54 लाख 54 हजार 72 रुपये एवढी संपत्ती आहे. तर धनंजय मुंडे यांची संपत्ती तीन कोटी 65 लाख 61 हजार 244 रुपये इतकी असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.
हेही वाचा- जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराने दाखल करावयाच्या शपथपत्रात धनंजय आणि पंकजा यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन स्वतःच्या नावावर नाही. तर 450 ग्राम सोने आणि 4 किलो चांदीसह दीड लाख रुपयांचे जडजवाहीर आहेत. त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 14 कोटी 33 लाख 55 हजार 429 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 25 लाख 40 हजार रुपयांची एक बीएमडब्ल्यू गाडी आहे. पंकजा मुंडे यांनी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध एकही प्रलंबित खटला किंवा गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा- राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?
दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर विविध आंदोलने तसेच संत जगमित्र साखर कारखाना अशा प्रकरणातील नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या नावावर दोन ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहने आहेत. शेअर्स आणि शेतीमध्ये धनंजय यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्या नावावर 3 कोटी 65 लाख 61हजार 244 रुपये जंगम तर 1 कोटी 14 लाख 90 हजार 522 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे 2 कोटी 20 लाख 90 हजार 964 रुपयांची जंगम आणि 25 लाख 14 हजार 635 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.