बीड - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असल्याने, गुरुवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच 26 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात दररोज दोनशे ते साडेतीनशेच्या आसपास कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागल्याने, अखेर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यानुसार आता अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहणार आहेत.
या सेवा राहणार बंद
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक- खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील तसेच सार्वजनिक ठिकाणी जमावबंदीचे आदेश आहेत. उपहारगृह सर्व रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल, मॉल, बाजार मार्केट बंद असतील. सर्व केशकर्तनालय, सलुन ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारच्या शिकवण्या पूर्णतः बंद राहणार आहेत. याबरोबरच सार्वजनिक व खासगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर, इत्यादीसाठी संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
'या' सेवा काही अटींसह राहणार सुरू
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांना काही बंधने घालून सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व ठोक किराना दुकानदारांची दुकाने सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. किरकोळ विक्रेत्यांना देखील सकाळी 7 ते 9 याच वेळतच घरपोच माल पोहोचवण्याची मुभा असेल. या काळात त्यांना सुरक्षीत अंतर ठेवत मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे दुध, दही, फळे, भाजिपाला या सारख्या नाशवंत पदार्थांची विक्री करण्यासाठी सकाळी 7 ते 10 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
हेही वाचा - नागपुरात 3095 कोरोना बाधितांची भर, 33 जणांचा मृत्यू