बीड - परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात 95 टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शनिवारी दिला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव व बीड तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर केंद्रेकर माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
यावेळी बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उप जिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना केंद्रेकर म्हणाले, की परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे 90 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. याची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी नुकसानीचे अर्ज करो किंवा न करो, सरसकट शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई पीक विमा कंपनी देणार आहे. याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. याशिवाय सरकारकडून नुकसानीची वेगळी मदत देखील देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई बाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. असे विभागीय आयुक्त केंद्रेकर म्हणाले.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे काढणीला आलेले पीक पाण्यात गेले आहे. अगोदर कोरडा तर आता ओला दुष्काळ मराठवाड्यात आहे. सरकार किती दिवसात शेतकऱ्यांना मदत करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.