बीड - मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पर जिल्ह्यांमधून ऊसतोड कामगार येत आहेत. जिल्ह्यात येत असताना त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. मात्र, चेक पोस्टवर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अत्यंत तोकडी असल्यामुळे तपासणीला मोठा विलंब लागत आहे. बुधवारी बीड तालुक्यातील चौसाळा येथील चेक पोस्टवर ऊसतोड मजुरांच्या 70 ते 80 ट्रक 4 ते 5 तास भर दुपारी उन्हात उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
चेक पोस्टवर ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ना सावली आहे. बुधवारी सकाळी मात्र काही लोकप्रतिनिधींनी फोटोपुरते जेवण वाटप केले व उष्णता वाढू लागताच तेथून काढता पाय घेतला. या सगळ्या परिस्थितीमुळे ऊसतोड मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. त्यामुळे परजिल्ह्यात लाखो ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी जातात. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अचानक सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले आणि हजारो ऊसतोड मजूर जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यावर अडकले. आता त्या मजुरांना बीड जिल्ह्यात आणण्यासाठी त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. ही बाब आरोग्यासाठी उत्तम आहे. मात्र जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अत्यंत तोकडी पडत असल्याने ऊसतोड मजुरांची प्रचंड हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीत ऊसतोड मजुरांबरोबर असलेल्या लहान मुलांचे प्रचंड हाल होत आहेत.
फोटोपुरतीच मदत -
बुधवारी सकाळी चौसाळा येथील चेक पोस्टवर एका पक्षाचे पदाधिकारी सकाळीच पोहोचले होते. उन्हाचा कडाका सुरू होण्यापूर्वी काही ऊसतोड मजुरांना नाश्ता दिला. मात्र जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी त्यांनी तेथून काढता पाय घेतला. अकराच्या नंतरच ऊसतोड मजुरांची आवक वाढली. त्यावेळी मात्र संबंधित पदाधिकारी तेथून गायब झाले. केवळ फोटोपुरताच मदतीचा फार्स काही जणांकडून केला जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र बहुतांश सेवाभावी संस्था पूर्ण शक्तीनिशी गरजू नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. एवढेच नाही तर प्रशासनाच्या ही अगोदर काही सेवाभावी संस्था गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
सावली व पाण्याची व्यवस्था करा -
चेक पोस्टवर येणाऱ्या ऊसतोड मजुरांबरोबर लहान लहान मुले आहेत. उन्हाची तीव्रता वाढत आहे. अशा परिस्थितीत ते पुढच्या बाजुला ऊसतोड मजुरांच्या कुटुंबातील नागरिकांना सावली प्राप्त करून द्यावी, अशी मागणीदेखील ऊसतोड मजुरांमध्ये होत आहे.